साताऱ्यात महिला पोलिसालाच लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:17+5:302021-04-23T04:42:17+5:30
सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी ग्रामपंचायत इमारतीजवळून घरी निघालेल्या महिला पोलिसाच्या हातातील मोबाईल व कॅल्सी हिसकावून ...
सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी ग्रामपंचायत इमारतीजवळून घरी निघालेल्या महिला पोलिसाच्या हातातील मोबाईल व कॅल्सी हिसकावून चोरट्याने पळ काढला. मात्र, त्या ठिकाणावरून निघालेल्या अन्य एका पोलिसाने चोरट्याला ओळखून त्याच्या नावाने हाक मारल्याने चोरट्याने साहित्य टाकून पळ काढला. ही घटना दि. २१ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, महिला पोलीस नाईक सरोजनी अजय शिंदे (रा. शाहूपुरी) या पोलीस ठाण्यातील कामकाज संपवून घरी निघाल्या होत्या. त्या शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळ आल्या असता, यल्या अनिल कोळी (रा. झोपडपट्टी, सातारा) याने त्यांच्या हातातील मोबाईल व कॅल्सी हिसकावून पळ काढला. दरम्यान, त्याचवेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार हसन तडवी हे निघाले होते. त्यांनी पळ काढणार्या संशयिताला ‘यल्या थांब,पळू नको’ असा आवाज दिला. पोलिसांनी आपल्याला ओळखल्याच्या भीतीने संशयिताने मोबाईल व कॅल्सी तेथेच टाकून आकाशवाणी झोपडपट्टीच्या दिशेने पळ काढला. तडवी यांनी संशयिताचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन त्याने पळ काढला. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्यात यल्या कोळी याच्याविरोधात जबरी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.