Satara: भरदिवसा घरातून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न, एकाला पकडले; कऱ्हाड तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 01:37 PM2023-08-14T13:37:59+5:302023-08-14T13:38:59+5:30

लग्नाला माझा व माझ्या आई- वडिलांचा विरोध असून, हे लग्न होऊ शकत नाही, असे युवतीने त्याला सांगितले. यानंतर युवतीने संपर्क तोडला.

Attempted abduction of young woman from home, Incidents in Karad taluka | Satara: भरदिवसा घरातून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न, एकाला पकडले; कऱ्हाड तालुक्यातील घटना 

Satara: भरदिवसा घरातून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न, एकाला पकडले; कऱ्हाड तालुक्यातील घटना 

googlenewsNext

कऱ्हाड : भरदुपारी घरात झोपलेल्या युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. यावेळी प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी अपहरण करणाऱ्यांचा पाठलाग करून एकाला पकडले, तर त्याचे साथीदार कार, तसेच दुचाकीवरून पसार झाले. कऱ्हाड दक्षिण विभागातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील नारायण पवार (ता. वाळवा, जि. सांगली), माणिक निवृत्ती लाड (रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य सात जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड दक्षिण विभागातील एका गावातील युवती २०१६ मध्ये नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहत होती. त्यावेळी सुनील पवार याचे तिच्या घरी येणे- जाणे होते. त्यातूनच सुनील पवार याने त्या युवतीला लग्नाची मागणी घालून मला तू आवडतेस, असे सांगितले होते.

मात्र, ही बाब समजल्यानंतर युवतीच्या पालकांनी तिला गावी आणले. त्यानंतर सुनील पवार याने वारंवार युवतीशी संपर्क साधला. मात्र, लग्नाला माझा व माझ्या आई- वडिलांचा विरोध असून, हे लग्न होऊ शकत नाही, असे युवतीने त्याला सांगितले. एप्रिल २०२३ नंतर युवतीने सुनीलशी असलेला संपर्क तोडला.

दरम्यान, शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर पीडित युवती त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आजीच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. त्यावेळी अचानक सात ते आठ जण घरात घुसले. त्यांनी त्या युवतीला जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणले. कारमध्ये घालून त्यांनी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील पवार याला युवतीने ओळखले. तिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी जमले. त्यांनी पाठलाग करून युवतीची सुटका केली, तसेच माणिक लाड या संशयिताला जागीच पकडले.

मात्र, इतर सात ते आठ जण कारमधून, तसेच दुचाकीवरून पळून गेले. याबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अर्चना शिंदे तपास करीत आहेत.

आजच लग्न करू, मी तयारीसह आलोय...

युवतीचे अपहरण करीत असताना पीडित युवतीने सुनील पवार याला ओळखले. त्यावेळी तिने सुनीलला मला कुठे घेऊन निघालाय, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण आजच्या आजच लग्न करू. मी तयारीनीशी आलोय, असे म्हणत युवतीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मात्र, तिने आरडाओरडा केल्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला.

Web Title: Attempted abduction of young woman from home, Incidents in Karad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.