भांडणे सोडविणाऱ्या भंगार व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:50+5:302021-03-30T04:22:50+5:30
सातारा : पती-पत्नीमध्ये पैशाच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेेल्या भंगार व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ...
सातारा : पती-पत्नीमध्ये पैशाच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेेल्या भंगार व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बबडी ऊर्फ राकेेश चव्हाण आणि फिरोज चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सचिन रघुनाथ मोरे (वय ३४, रा. गोडोली नाका, शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे, गोडोली, सातारा) हा भंगार गोळा करतो. तो शनिवार, दि. २७ रोजी त्याच्या झोपडीसमोर उभा असतानाच, बबडी ऊर्फ राकेश श्रीपत चव्हाण आणि त्याची पत्नी सपना या दोघांचे पैशाच्या कारणावरून भांडण सुरू होते. ते भांडण सोडविण्यासाठी सचिन मोरे तिथे गेला असताना, बाजूला असलेला फिरोज चव्हाण तेथे आलास? आणि ‘तू येथे कशाला आलास? तुझा काय संबंध?’ असे म्हणू लागला. दरम्यान, बबडी आणि सपना या दोघांचे भांडण सुरू असतानाच सचिन आणि फिरोज या दोघांमध्ये जुन्या झोपडीच्या जागेच्या कारणावरून वाद सुरू झाला. यावेळी फिरोज याने सचिन याची पत्नी रेखा हिला ‘तुला जिवंत सोडणार नाही. तुझा मर्डरच करतो’, अशी धमकी देत शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, फिरोज याने यावेळी सचिन याच्या डोक्यात वीट घातली. त्यानंतर फिरोज पुन्हा झोपडीत गेला आणि त्याने लोखंडी रॉड आणून त्याच्या डोक्यात घातला. यात सचिन खाली पडला. या भीतीमुळे फिरोज तेथून पळून गेला.
दरम्यान, बबडी ऊर्फ राकेश याने सचिनच्या पाठीत कुकरीने, तर खांदा आणि छातीवर चाकूने वार करून जखमी केले. यात सचिन गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सचिन याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बबडी ऊर्फ राकेश श्रीपत चव्हाण आणि फिरोज श्रीपाद चव्हाण (दोघे रा. गोडोली नाका, शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे, गोडोली, ता. सातारा) या दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.