निवडणुकीतील युतीकडे सर्वांचे लक्ष
By admin | Published: September 23, 2016 11:25 PM2016-09-23T23:25:04+5:302016-09-24T00:20:08+5:30
अनेकांचे देव पाण्यात : पाटणमध्ये मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात
अरुण पवार ल्ल पाटण
पाटण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यामुळे होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेकांचे देव पाण्यात असून, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. एका बाजूला सत्ताधीश म्हणून पाटणकर गट उभा आहे. त्यांच्यासमोर कडवे आव्हान देण्यासाठी इतरांची महायुती होण्याची शक्यता आहे. देसाई गट, भाजपा, मनसे, शिवसेना व पाटणमधील काही गट यांनी आपापली भूमिका बोलून दाखविली आहे.
प्रभाग १७ आणि उमेदवारही तितकेच आहेत. मात्र एका प्रभागात सुमारे ७०० मतदार त्यामुळे ज्या प्रभागात ज्याचा प्रभाव तोच उमेदवार नगरसेवक होणार आहे. तरीसुद्धा राजकीय नेत्यांची व पक्षांची ताकदसुद्धा महत्त्वाची आहे. पाटणच्या बाबतीत एकूण १७ प्रभागांमध्ये माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाची छाप आहे. तरीसुद्धा आमदारकीच्या निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई यांना मतदान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याचा विचार करूनच आमदार देसार्इंनी पाटण नगरपंचायत निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ‘पाटणकर विरोधी इतरांनी एकत्र आल्यास निश्चित यश मिळेल,’ अशी आ. देसार्इंची इच्छा आहे. मनसे व इतर पक्ष देखील निवडणूक लढविणार आहेत. माजी आमदार पाटणकर यांची आत्तापर्यंतची पाटण शहरातील पकड कायम असल्याचे पाटण ग्रामपंचायत निवडणुकांमधून दिसले आहे. त्यामुळे पाटणकर
गटाला इतर पक्ष व गटतटांशी हातमिळविणी करण्याची सध्याची गरज वाटत नाही.
नगरपंचायत निवडणूक हेच एकमेव लक्ष
पाटण तालुक्यात देसाई-पाटणकर गट हे प्रमुख राजकीय दावेदार आहेत. सद्य:स्थितीत आमदार शंभूराज देसार्इंमुळे त्यांचा गट नेहमीच उत्साही दिसत आहे. दुसरीकडे पाटणकर गटात शांतता असल्याचे बोलले जाते. नेते कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीत. तरीसुद्धा नुकत्याच सार्वजनिक गणेश मंडळांना सत्यजित पाटणकर यांनी दिलेल्या भेटी व आगामी पाटण नगरपंचायत निवडणूक यामुळे पाटणकर गट आपोआपच चार्ज होणार हे निश्चित आहे. आता सर्वांसमोर नगरपंचायत निवडणूक हेच लक्ष आहे.
देसार्इंना हीच वेळ योग्य...
पाटण शहरात जवळपास १२ हजार मतदान आहे. या मतदारांवर पाटणकर गटाची मदार आहे. या ठिकाणी आ. देसार्इंच्या मागे येणारा उघड गट नाही. म्हणूनच नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आ. देसार्इंना पाटण शहरामध्ये शिरकाव करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे पाटणमधील कार्यकर्त्यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत.