Gram Panchayat Election: जुळेवाडीत अतुल भोसलेंच्याच नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे जुळेना!, समर्थकांचीच पॅनेल आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:59 AM2022-12-12T11:59:03+5:302022-12-12T11:59:28+5:30
सरपंचपदच बनले कळीचा मुद्दा
प्रमोद सुकरे
कराड : जुळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबर रोजी होत आहे. त्यासाठी दोन पॅनेल एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. पण दोन्ही पॅनेलचे समर्थक भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांना मानणारेच असल्याने त्यांच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे जुळले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
एकेकाळी रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीचाच एक भाग म्हणून जुळेवाडीची ओळख होती. पण सन १९९२ साली जुळेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. त्यावेळी पासून डॉ. भोसले गटाचीच सत्ता या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. शंकर काशीद हे या गावचे पहिले सरपंच राहिले आहेत. त्यानंतर सन १९९७ ते आज अखेर डी.एस.सोमदे यांच्या नेतृत्वाखाली या गावचा कारभार चालला होता. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.
जुळवडीची लोकसंख्या चार ते साडेचार हजाराच्या आसपास आहे. कृष्णा काठचे एक समृद्ध गाव म्हणून या गावाची ओळख आहे. लोकसंख्येच्या नुसार येथे ११ ग्रामपंचायत सदस्य व थेट जनतेतून सरपंच अशी निवडणूक होत आहे.
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले ग्रामविकास सहकार पॅनेल च्या वतीने नितीन वसंत बाकले हे सरपंचपदाचे उमेदवार आहेत. विकास सोसायटीचे अध्यक्ष सुनील बाकले, सतीश सोमदे आदी मंडळी या पॅनेलसाठी झटत आहेत. तर सहकारमहर्षी जवंतराव भोसले ग्रामविकास पँनेलचे अधिकराव सोमदे सरपंच पदाची निवडणूक लढवीत आहेत. डॉ. प्रकाश सोमदे, महादेव सोमदे आदी मंडळी त्यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत.
आता या निवडणुकीत निकालानंतर गुलाल भोसलेंवरच पडणार हे निश्चित आहे; पण स्थानिक नेमका कोणता गट निकालात बाजी मारणार ?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.पण त्यासाठी थोडे थांबावेच लागेल.
सरपंचपदच बनले कळीचा मुद्दा
जुळेवाडी ग्रामपंचायतीत यंदा सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आणि थेट जनतेतून होत आहे. त्यामुळेच सरपंचपदाची महत्वकांक्षा आनेकांच्यात जागृत झाली. त्यामुळे बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठीचे प्रयत्न कामी आले नाहीत. परिणामी दोन पॅनेलचे २ आणि अपक्ष २ असा सरपंच पदासाठी चौरंगी सामना पाहायला मिळत आहे.
एकजण बिनविरोध
जुळवाडीची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी गावातील काही प्रमुख मंडळींनी प्रयत्न केले. मात्र त्याला तितके यश आले नाही .पण विश्वासराव जगदाळे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
दोन्ही पॅनेलला जयवंतराव भोसले यांचेच नाव
या निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले समर्थकांचीच दोन पॅनेल आमने-सामने उभी ठाकली आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पॅनेलला दिवंगत जयवंतराव भोसले यांचेच नाव आहे.अन फलकावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ.सुरेश भोसले, विनायक भोसले यांच्या छबी दिसत आहेत.