सर्जनशील समाजासाठी सजक कार्यकर्त्याची गरज अतुल पेठे : ‘अंनिस’च्या कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
By Admin | Published: May 13, 2014 11:51 PM2014-05-13T23:51:14+5:302014-05-13T23:53:31+5:30
सातारा : ‘वर्तमान आणि भविष्यकाळ हा समाजाच्या विकासाच्यादृष्टीने कसोटीचा आहे. या काळात सर्जनशील समाजासाठी समाजभान
सातारा : ‘वर्तमान आणि भविष्यकाळ हा समाजाच्या विकासाच्यादृष्टीने कसोटीचा आहे. या काळात सर्जनशील समाजासाठी समाजभान व स्वभान असलेल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. डॉ. दाभोलकरांच्या विचारातून तयार झालेले कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र वैचारिक, बौध्दिक कार्यकर्ते घडविण्याचे काम करेल,’ असा विश्वास अतुल पेठे यांनी व्यक्त केला. सातारा येथील ‘तारांगण’, युनायटेड वेस्टर्न बँक कॉलनी, शाहूनगर-गोडोली येथे ‘अंनिस’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन समांतर नाट्यचळवळीतील दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष विजय मांडके होते. यावेळी ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, चित्रा दाभोलकर, दत्तप्रसाद दाभोलकर, माधव बावगे उपस्थित होते. पेठे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत काही मोजक्याच कुटुंबांनी मोलाची जबाबदारी पार पाडली आहे. दाभोलकर कुटुंबीय हे त्यातील एक आहे. दाभोलकरांच्या विचारातून अनेक कार्यकर्ते घडले आहेत. त्यांचे संस्कार, वैचारिक परंपरेचा वारसा या वास्तूला लाभला आहे. याच जागेत सुरू होत असलेले कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण आहे. सध्या समाजात अराजकता निर्माण झाली आहे. राजकीय नेतेमंडळीही काहीही बोलत आहेत. यातून नैतिकता लोप पावत चालली आहे. त्यामुळे आगामी काळ हा संकटांचा, भयानकतेचा असल्याने गुंतागुंत निर्माण करणारा असणार आहे.’ पाटील म्हणाले, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचाराने अनेक घटनांचा सामना करत समाजात वैचारिक जडणघडण केली आहे. या चळवळीच्या प्रवाहात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली आहे. सातारा येथे सुरू होत असलेले कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र चळवळीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहे.’ (प्रतिनिधी)