साताऱ्यातील टोलनाक्याचे ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:45+5:302021-03-06T04:37:45+5:30
सातारा : ‘पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यावर बोगस पावत्या पकडण्यात आल्या आहेत. साताऱ्यातीलही टोलनाक्याचे ऑडिट करावे. पावत्या बोगस आढळल्यास गुन्हा दाखल ...
सातारा : ‘पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यावर बोगस पावत्या पकडण्यात आल्या आहेत. साताऱ्यातीलही टोलनाक्याचे ऑडिट करावे. पावत्या बोगस आढळल्यास गुन्हा दाखल करा असे सांगितले आहे,’ अशी माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे, शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, आदी उपस्थित होते.
खासदार पाटील यांनी सुरुवातीला ‘दिशा’बद्दल माहिती दिली. केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा जिल्ह्यातील आढावा घेण्यासाठी तीन महिन्यांतून एकदा ‘दिशा’ची बैठक होणे अपेक्षित असते असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ‘दिशा’ समितीचे स्वरूप सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय पेयजल, पीक विमा, स्वच्छ भारत, सर्वशिक्षा अभियान, नरेगा अशा विविध योजना केंद्राच्या वतीने राबविण्यात येतात. या योजनांचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे. अडीअडचणी असतील तर खासदारांच्या मार्गदर्शनाखाली सोडविणे, नवीन कल्पना राबविणे असा हेतू यामागे आहे. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन आणि पेयजलचे काम चांगले झालेले आहे.
चौकट :
२७५ रुपयांचा पास महिन्यासाठी...
या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ आणि एमएच १४ वाहनांना टोलमाफी आहे. साताऱ्यात होणार का, हा प्रश्न उपस्थित केला. यावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी टोलच्या परिसरातील २० किलोमीटर क्षेत्रात माफी मिळत नाही, अशी मला माहिती मिळाली आहे. पण, या क्षेत्रातील लोकांना २७५ रुपयांत महिन्याचा पास मिळतो; तर महामार्गचे अधिकारी चिटणीस यांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावरील माफी ही तात्पुरती असावी, असे सांगत टोलच्या २० किलोमीटर परिसरातील व्यवसायासाठी न वापरणाऱ्या वाहनधारकांना २७५ रुपयांचा महिना पास देण्यात येतो, असे स्पष्टीकरण दिले.
..........................................................