औंधचे भवानी वस्तूसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले, कोरोना महामारीमुळे बंद होतं संग्रहालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:21 PM2022-02-08T16:21:34+5:302022-02-08T16:22:23+5:30
भवानी वस्तूसंग्रहालय पाहण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागतो
औंध : येथील जगप्रसिद्ध भवानी वस्तूसंग्रहालय पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत पर्यटकांना विविध कलाकुसरी पाहता येणार आहेत. संग्रहालय खुले झाल्याने गर्दी टाळून मास्क वापरून संग्रहालय पाहण्यासाठी यावे असे आवाहन संग्रहालय प्रशासनाने केले आहे.
कोरोनापासून अनेक महिने बंद असलेले श्री भवानी संग्रहालय मागील सव्वा महिन्यापूर्वी खुले करण्यात आले होते. मात्र त्यानंतर लगेचच ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आले होते. आता काही अटी व शर्तींना अधीन राहून प्रशासनाने तीन दिवसांपासून संग्रहालय पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. त्यामुळे गेली अनेक महिने संग्रहालय पाहण्यासाठी आतुर असलेले पर्यटक, संग्रहालयप्रेमी पाहण्यासाठी येणार आहेत.
अप्रतिम आणि दुर्मिळ कलाकृतीचा खजिना असलेल्या या संग्रहालयाला देश-विदेशातून अनेक पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आल्यावर कलारसिकाना दुमजली संग्रहालय पाहण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागतो. एकूण ३२ विभागांमध्ये सर्व कलाकुसरीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे संग्रहालय प्रशासनाने जाहीर केले आहे.