औंध प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:32 AM2021-05-03T04:32:56+5:302021-05-03T04:32:56+5:30
औंध : औंधमध्ये २० एप्रिलपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ...
औंध : औंधमध्ये २० एप्रिलपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामदक्षता समिती यांच्यात झालेल्या बैठकीत संपूर्ण गाव पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, डॉ. युनूस शेख यांच्यासह पथकाने शुक्रवारी औंधला भेट दिली. कोरोना संदर्भात बैठक घेऊन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामदक्षता समितीसोबत ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली.
गावात दररोज वाढणारी रुग्णांची संख्या पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रांताधिकारी कासार यांनी संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता मेडिकल सर्व दुकाने बंद राहणार आहेत. औंधच्या रुग्णसंख्येचा आकडा आता दीडशेच्या आसपास असून, आकडा वाढतच चालला आहे.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामदक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.
फोटो : औंधमध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)