औंध संगीत महोत्सव आॅनलाइन पद्धतीने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 01:19 PM2020-11-19T13:19:03+5:302020-11-19T13:21:46+5:30
Coroanavirus, music, sataranews, audndh अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान (डोंबिवली) संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा औंध संगीत महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने २२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा या महोत्सवाचे ८० वे वर्ष आहे.
औंध : अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान (डोंबिवली) संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा औंधसंगीत महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने २२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा या महोत्सवाचे ८० वे वर्ष आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अनंतबुवा जोशी यांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औंध येथे १९४० पासून हा उत्सव सुरू केला. सुरुवातीला छोटेखानी स्वरूप असलेल्या या उत्सवाचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. पं. अंतुबुवा यांचे पुत्र प्रख्यात गायक व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांनी १९८१ साली शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून हा महोत्सव शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आयोजित केला जातो.
२२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पहिले सत्र सुरू होईल. या सत्राची सुरुवात युवा कलाकार यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यांना तबला साथ विश्वनाथ शिरोडकर करणार आहेत. यानंतर विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन सादर होणार आहे. त्यांना लेहरा साथ सिद्धेश बिचोलकर देणार आहेत. प्रथम सत्राची सांगता विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ सौमित्र क्षीरसागर यांची तर तबला साथ पुष्कर महाजन यांची असणार आहे.
द्वितीय सत्राची सुरुवात सायंकाळी ६ वाजता सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ सुयोग कुंडलकर करणार आहेत. तर तबला साथ चारुदत्त फडके यांची आहे. यंदाच्या औंध संगीत महोत्सवाची सांगता हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यांनाही संवादिनी साथ सुयोग कुंडलकर करतील, तर तबला साथ प्रणव गुरव करणार आहेत.