औंध पोलिसांची अवैध वाळूवर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:03+5:302021-05-25T04:44:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंध : खटाव तालुक्यातील कोकराळे येथे सोमवारी सकाळी विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह वाळू व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : खटाव तालुक्यातील कोकराळे येथे सोमवारी सकाळी विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह वाळू व दोन दुचाकींसह सुमारे १३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. खटाव येथील पाचजणांना औंध पोलिसांनी अटक केली. औंध पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैधरित्या वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाळूचोरीप्रकरणी किशोर प्रल्हाद कदम (वय ४८), दीपक शंकर शिंदे (३३), अनिल बापू कांबळे (३१), रजनीकांत शंकर शिंदे (३१), अक्षय बाळू कांबळे (३०, सर्व रा. खटाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
औंध पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी पहाटे साडेपाच ते सहाच्यादरम्यान मायणीनजीकच्या येरळा नदीपात्रातून तीन ट्रॅक्टरमधून विनापरवाना वाळू उपसा करून तो कोकराळे येथील घराच्या बांधकामासाठी नेत असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्यासह पोलीस पथकाने कोकराळे येथे सापळा रचून तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकी गाड्या तसेच तीन ब्रास वाळू असा एकूण १२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस नाईक प्रशांत पाटील, पंकज भुजबळ, कुंडलिक कटरे, महेश जाधव तपास करीत आहेत.
फोटो :
औंध पोलिसांनी सोमवारी अवैध वाळूवर कारवाई केली. (छाया : रशिद शेख)