Satara News: औंध पोलिस स्टेशन सलग दहाव्या जिल्हा पुरस्काराने सन्मानित, सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार
By दीपक शिंदे | Published: March 18, 2023 02:21 PM2023-03-18T14:21:07+5:302023-03-18T14:22:53+5:30
विविध घटनांमधून बारकाईने तपास करून अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
औंध : औंध पोलिस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. विविध घटनांमधून बारकाईने तपास करून अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याने सलग दहाव्या जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे औंध पोलिस ठाण्याची मान उंचावली आहे. शुक्रवारी सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
फेब्रुवारी महिन्यात चोराडे फाटा येथे झालेल्या लूटमार प्रकरणात चोरट्यांचा छडा लावून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला, तसेच केबल चोरी प्रकरणात नाकाबंदी करून आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला व या गुन्ह्यासह एकूण चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणले. यामध्येही सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत केला.
चोराडे फाटा येथे झालेल्या जबरी चोरीमध्ये आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने तपासात अनेक अडचणींचा सामना करीत सलग एक महिना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून सदरचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले. त्याबद्दल सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी औंध पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलिस नाईक प्रशांत पाटील, किरण जाधव, महेश जाधव आदीसह कर्मचारी उपस्थित होते. या गौरवास्पद कामगिरीबद्दल औंध पोलिसांचे परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
औंध पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी धडपडत असतो. या भागातील क्राइम रेट कमी करण्यासाठी आमचा जिल्हा पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहे. काम करीत असताना शाबासकीची थाप मिळाली की बळ मिळते. - दत्तात्रय दराडे -सहायक पोलिस निरीक्षक औंध.