औंध : मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आज अष्टमी उत्सव : औंधमध्ये भक्तिमय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:09 PM2018-10-16T23:09:41+5:302018-10-16T23:12:17+5:30

येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीच्या अष्टमी उत्सवानिमित बुधवारी देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे.

Aundh: Today's Ashtami festival will be celebrated by the devotees of the holy city: Various programs, devotional atmosphere in Aundh | औंध : मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आज अष्टमी उत्सव : औंधमध्ये भक्तिमय वातावरण

औंध : मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आज अष्टमी उत्सव : औंधमध्ये भक्तिमय वातावरण

googlenewsNext
ठळक मुद्देमूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे. अष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम देवीची पालखी मिरवणूक डोंगरावर काढली जाणार

औंध : येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीच्या अष्टमी उत्सवानिमित बुधवारी देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे. अष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळपीठनिवासिनी, ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी तसेच श्री कराडदेवी येथे नवरात्रोत्सवानिमित मागील आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

बुधवार, दि. १० रोजी कराडदेवीचे पूजन करून पुण्यहवाचन करून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व चारुशिलाराजे यांच्या हस्ते देवीची मकरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर नियमित दुपारी व रात्री महानैवेद्य महाआरती, मंत्रपुष्पांजली तसेच नियमित गजाननबुवा कुरोलीकर यांचे सायंकाळी हरिदासी व रात्री कराडदेवी येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. देवीच्या पाट्यापूजन ओटी पूजनाचा कार्यक्रमही झाला आहे.

मूळपीठ डोंगरावर अष्टमी उत्सवानिमित मूळपीठ डोंगरावर दुपारी दोन ते तीन या वेळेत मंदिरातील उत्सवमूर्तीचे पूजन केले जाणार आहे. यावेळी श्री यमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीची पालखी मिरवणूक डोंगरावर काढली जाणार आहे. यावेळी पाच प्रदक्षिणादरम्यान विविध देवतांना भेटी देऊन उपस्थित हजारो भाविकांना प्रसाद वाटून यात्रोत्सव होणार आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांमध्ये हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मूळपीठ गर्दी केली होती. यावेळी मिनीबसची ही सोय एसटी विभागाने केली आहे.

गुरुवार, दि. १८ रोजी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रमांबरोबर देवीची घटउत्थापना कार्यक्रमाबरोबर कुमार-कुमारी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नवरात्र पाठांची ब्राह्मण दक्षिणा, सुहासिनींना दक्षिणा, खण, साडी, नारळाने ओटी भरणे, दक्षिणा देणे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच नियमित दोन वेळेस वाद्यवृंदाची सलामी दिली जाणार आहे. तसेच राजवाड्यातील शस्त्रपूजा केली जाणार आहे. त्यानंतर औंध येथील ग्रामस्थांना राजवाड्यात दसरा उत्सवानिमित जेवण दिले जाणार आहे.

औंध गावातील श्री यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करून, वाद्यवृंदाची सलामी देऊन देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी निघणार आहे. तसेच औंध गावातील होळीचा टेक, केदार चौकमार्गे गावाच्या उत्तरेकडील काजळवडानजीच्या सीमेवर देवीची पालखी नेऊन औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवर, मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर डब्बे लावून गोळीबार केला जाणार आहे. पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

देवीची पूजा बांधणी आकर्षक..
ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवीची मागील सात दिवस घटावरील, झोपाळ्यावर आरुढ पूजा, मोरावर आरुढ, सरस्वती रुपातील, सालंक्रू त पूजा, शिवरुपातील, विविध रुपातील बैठी व आकर्षक देवीची वेगवेगळ्या रुपातील पूजा पुजारी बांधवांच्या वतीने बांधल्या.
शंभरहून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी
नवरात्र उत्सवामुळे मागील पाच दिवसांपासून औंध येथे मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. मात्र, रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याने पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण वाढला होता. तसेच होमगार्ड व पोलीस मिळून सुमारे १०० च्या आसपास कर्मचारी बंदोबस्त करण्यासाठी तैनात आहेत.


 

 

Web Title: Aundh: Today's Ashtami festival will be celebrated by the devotees of the holy city: Various programs, devotional atmosphere in Aundh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.