स्मशानभूमी बंद करण्याची औंध ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:38 AM2021-01-20T04:38:16+5:302021-01-20T04:38:16+5:30
औंध : औंध-खबालवाडी रस्त्याजवळ असणारी स्मशानभूमी बंद करण्याची मागणी औंध ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
औंध : औंध-खबालवाडी रस्त्याजवळ असणारी स्मशानभूमी बंद करण्याची मागणी औंध ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या स्मशानभूमीच्या तिन्ही दिशांना घरे आहेत. स्मशानभूमी लोकवस्तीत असल्याने अंत्यविधीच्या वेळी धूर, काजळी, वास हा घरापर्यंत जात आहे. ज्या वेळी हा विधी तिथे असतो, त्यावेळी आसपासचे लोक घरांची दारे लावून बसत आहेत. घराकडे येण्या-जाण्याचा तोच मार्ग असल्याने लहान मुले व स्त्रिया घाबरत आहेत. रहिवाशांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता, स्मशानभूमीची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी.
जनतेच्या भावनांचा विचार करून यावर लवकर तोडगा काढण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
यावेळी धनाजी आमले, जयसिंग घार्गे, वसंत पवार, चंद्रकांत पवार, संभाजी कुंभार, संतोष भोसले, नामदेव भोसले, गणेश चव्हाण, गणेश शिंदे, संजय भोसले, विमल खैरमोडे, कुसुम खैरमोडे, वनिता कोळी, श्वेता कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.