औंधची दीपमाळ आज होणार प्रज्वलित छबिनोत्सव, दीपप्रज्वलनाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:19 PM2018-01-01T23:19:17+5:302018-01-01T23:19:49+5:30
औंध : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्रीयमाईदेवीचा छबिना व दीपप्रज्वलन सोहळा मंगळवारी
औंध : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्रीयमाईदेवीचा छबिना व दीपप्रज्वलन सोहळा मंगळवारी (दि. २ जानेवारी) रात्री आठ वाजता श्री यमाईदेवी देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
पौष शाकंभरी पौर्णिमेनिमित्त औंधची ऐतिहासिक दीपमाळ प्रतिवर्षी प्रज्वलित केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. नुकतेच दीपमाळेचे काम १७ लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध भागांतून भाविक हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले आहेत.
मंगळवारी सायंकाळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते श्रीयमाईदेवीचे पूजन करून, आरती, मंत्रपठणानंतर हा दीपप्रज्वलन सोहळा होणार आहे. यासाठी भाविक खाद्य तेल तसेच इतर ज्वालाग्राही पदार्थ अर्पण करीत आहेत. राजवाडा पटांगणावर हे पदार्थ स्वीकारले जात आहेत. सुरवातीला दीपमाळेचे कुंड पेटविले जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण दीपमाळ प्रज्वलित केली जाणार आहे. त्यानंतर श्रीयमाईदेवीची औंध गावातून पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मोतीची कमी प्रकर्षाने जाणवणार
औंधचा गजराज ऊर्फ मोती हत्तीची छबिनोत्सव कार्यक्रमात गेली कित्येक दशके सलामी असायची; यंदा मोतीची कमी औंधकरांना प्रकर्षाने जाणवणार आहे. सोशल मीडियावरही ‘मोती मिस यू’ च्या पोस्ट झळकत आहेत.
औंध येथील यमाई मंदिरातील हीच दीपमाळ मंगळवारी प्रज्वलित केली जाणार आहे.