औंधमध्ये आई उदे ग अंबे उदेचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:26+5:302021-02-05T09:05:26+5:30
औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक पौषी रथोत्सव मोजके भाविक, ...
औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक पौषी रथोत्सव मोजके भाविक, मानकरी व औंध ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने ‘आई उदे ग अंबे उदे’च्या गजरात पार पडला.
शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या औंधच्या श्री यमाई देवी रथोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने करण्यात आला.
प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामनिवासिनी श्री यमाई देवी मंदिरात श्री यमाई देवीच्या उत्सवमूर्तीचे विधीवत षोडशोपचारीने पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते आणण्यात आली. यावेळी देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले.
यावेळी गणेश इंगळे यांनी पौरोहित्य व मंत्रपठन केले. यावेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांंच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. त्याठिकाणी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते रथपूजन करून देवीची दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी जितेंद्र पवार, संदीप मांडवे, सरपंच सोनाली मिठारी, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, उपसरपंच दीपक नलवडे, सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, शीतल देशमुख, वहिदा मुल्ला, शुभांगी हरिदास, वंदना जायकर, शाकिर आतार, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, चंद्रकांत कुंभार, अनिल माने, इलियाज पटवेकरी, रमेश जगदाळे, संजय निकम, अशोक देशमुख, दीपक कदम, नंदकुमार शिंदे, उमेश थोरात, संजय यादव, गणेश हरिदास, श्रीपाद सुतार, वसंत जानकर, सदाशिव पवार, सुखदेव इंगळे, शहाजी यादव, भरत यादव, शैलेश मिठारी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
चौकट :
औंधमध्ये शुकशुकाट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या मुख्य दिवशी औंध गावातील सर्व आर्थिक व्यवहार, दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आली. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे औंध ग्रामस्थांनी पालन केले. त्यामुळे औंधमध्ये शुकशुकाट जाणवत होता.
फोटो : २९अौंध-रथोत्सव
औंध येथे पौषी उत्सवानिमित्त शुक्रवारी श्री यमाई देवीची रथात प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, जितेंद्र पवार, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, सरपंच सोनाली मिठारी, दीपक नलवडे उपस्थित होते. (छाया रशिद शेख)