प्राधिकरणचा गौप्यस्फोट; ‘खड्डे आमचे नव्हेतच!’
By admin | Published: February 24, 2015 10:54 PM2015-02-24T22:54:23+5:302015-02-25T00:08:04+5:30
नागरिकांना उल्लू बनाविंग : शहरात कोणतेही काम सुरू नसल्याचे जीवनप्राधिकरणचे म्हणणे
दत्ता यादव - सातारा -शहरातील रस्त्यांची कामे जीवन प्राधिकरण विभागामुळे लांबणीवर पडल्याचा आरोप इकीकडे होत असताना गेल्या सहा महिन्यांपासून शहरात कुठेही एकदाही रस्ता खोदला नसल्याचा दावा प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अशाप्रकारच्या पालिकेकडून होत असलेल्या वारंवार आरोपांच्या ‘खेळी’मुळे प्राधिकरण विभाग मात्र आचंबित झाला आहे.
शहराच्या विकासाचा केंद्र बिंदू म्हणून पालिकेकडे पाहिले जाते. कोणता विभाग कुठले काम करतो, याचे नागरिकांना देणे-घेणे नसते. मात्र ‘आपण कर भरतो,’ म्हटल्यानंतर सुखसोयी चांगल्या मिळाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा असते. आणि त्यामध्ये गैरही काहीही नाही. सध्या सातारा पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची एकमेकांवर होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे शहरातील रस्त्याचा मुख्य प्रश्न मात्र लांबवणीवर पडत आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे.जीवन प्राधिकरणाची योजना लांबणीवर पडल्यामुळे रस्त्यांची कामे रखडली गेली,’ असा आरोप होत असल्याने प्राधिकरण विभागाला मात्र हे चांगलेच झोंबले आहे. आतापर्यंत कधीही पालिकेच्या आरोपांना प्रत्युत्तर न देणारे अधिकारीही आता बोलू लागले आहेत. त्यामुळे पालिकाविरूद्ध जीवन प्राधिकरण हा नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.शहरात सात ते आठ महिन्यापुर्वीच १२० किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याची कामे पूर्ण झाली आहेत. शहरात आता कसलेही आमच्या विभागाची कामे सुरू नाहीत. असे असताना पालिकेचे हे सर्व आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पोवई नाक्यावरील सभापती निवास स्थानासमोरील पाईपलाईन गळतीचा जो मुद्दा वारंवार उपस्थित होतो, त्या विषयी अधिकारी आपल्या चूका मान्य करताहेत. या पाईपलाईनचे काम १९६८ ला पूर्ण झाले. जुन्या पद्धतीने पाईपलाईनची रचना असल्यामुळे तसेच एखादे जड वाहन त्यावरून गेल्यास त्या ठिकाणी वारंवार गळती लागत आहे. हे टाळण्यासाठी दोन दिवसांत काम हाती घेणार असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु केवळ एका समस्येमुळे प्राधिकरण विभागाकडे वारंवार बोट दाखविले जाते. हे म्हणजे चोर सोडून सन्यासाला फाशी देण्यासारखे असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जीवन प्राधिकरणाची कामे पूर्ण झाले असताना पालिका प्रशासन जबाबदारी का झटकत आहे. तसेच या दोघांच्या वादामध्ये शहरातील रस्त्यांचा प्रश्न अजून किती दिवस लटकणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहर विकासासाठी काही वेळेला नक्कीच खोदकाम करावे लागतात. यात शंका नाही. मात्र, दर दोन दिवसांनी खोदकाम करुन रस्त्यांची चाळण केली जाते. यामुळे नागरिक त्रस्त असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सातारा पालिका एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम आहेत. यासंदर्भात जाब विचारला तर ते आमचे काम नाही, असे सांगून नागरिकांना ‘उल्लू’ बनविण्याचे काम केले जात आहे. प्रशासनाने हातात हात घालून कारभार करण्याची गरज आहे.
डांबरीकरणाला मुहूर्तच मिळेना
गेल्या सहा महिन्यांपासून शहरात सुधारित पाणी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खचखळग्यातून रोज वाटत काढत जाणारे नागरिक पालिकेच्या नावाने बोटे मोडत जातात. एकदाचा रस्ता काय खोदायचा ते खोदा, अशी मानसिकता सातारकरांची झालीय. मात्र अद्यापही शहरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा मुहूर्त मिळेनासा झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रया व्यक्त होत आहेत.
‘पॉवरहाऊसपासून पुढे डोंगरावर साडेचार किलोमीटरपर्यंत पाईपलाईनचे काम बाकी आहे. हे काम करत असताना रस्ते खोदण्याचा काही संबंध येत नाही. तसेच शहरातही यापुढे रस्ते खोदण्याचा प्रश्नच येणार नाही.’
- विजय मेंगे,
कार्यकारी अभियंता