आटोली परिसरात गवा आलाय वस्तीला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:20 PM2018-09-07T23:20:28+5:302018-09-07T23:20:32+5:30
पाटण : तालुक्याच्या मोरणा पठारावर असलेल्या आटोली गावच्या भाकरमळी वस्तीत शुक्रवारी सकाळीच गवारेड्यांचा कळप प्रवेश करण्याच्या तयारीत होता. वेळीच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कळपाला हुसकावून लावले. या घटनेने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या शेजारी जंगल असून, हा वीस गव्यांचा कळप पुन्हा वस्तीत शिरकाव करण्याची दाट शक्यता ग्रामस्थांतून वर्तवली जात आहे.
चांदोली आणि कोयना अभयारण्याच्या सीमेलगत आटोली हे गाव आहे. या गावातील पांढरे पाणी, भाकरमळी या वस्त्या घनदाट जंगलानजीक येतात. कोयना आणि चांदोली अभयारण्य ही जंगली प्राण्यांची माहेरघर आहेत. खास करून गवारेडे आणि बिबटे यांची या अभयारण्यात संख्या लक्षणीय आढळते.
जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात यापूर्वी येथील अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. शेळ्या, गाय, म्हैस आदींसह पाळीव जनावरेही जंगली प्राण्यांची शिकार बनले आहेत. तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. या वाढलेल्या गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकºयांना शेतीचे नुकसान तर सहन करावे लागत आहेच, शिवाय त्यांची पाळीव जनावरेही जंगली पाण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत असल्याने आर्थिक फटकाही बसत आहे.