अवघी शाहूनगरी शिवमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:50 AM2021-02-20T05:50:53+5:302021-02-20T05:50:53+5:30

सातारा : ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयघोष अन् शिवपराक्रमाचा इतिहास जागविणारे पोवाडे अशा उत्साही वातावरणात जिल्ह्यात शुक्रवारी शिवजयंती साजरी ...

Avaghi Shahunagari Shivamay | अवघी शाहूनगरी शिवमय

अवघी शाहूनगरी शिवमय

Next

सातारा : ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयघोष अन् शिवपराक्रमाचा इतिहास जागविणारे पोवाडे अशा उत्साही वातावरणात जिल्ह्यात शुक्रवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचे सावट असल्याने यंदा मोठ्या मिरवणुकीवर निर्बंध घालण्यात आले; परंतु शिवभक्तांचा उत्साह काही कमी झाला नाही.

जिल्ह्यात शिवजयंतीच्यानिमित्ताने शिवज्योती आणण्याबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा या ऐतिहासिक किल्ल्यांवर विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवज्योत आणण्यासाठी गर्दी केली होती. मंडळांचे कार्यकर्ते शिवज्योत घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ झाले.

सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी प्रतिमापूजन, जन्मकाळ, पोवाडा, शिवचरित्रावर व्याख्यान आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील चौका-चौकात भगवे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच शिवपराक्रमाचा इतिहास जागविणारे पोवाडेही लावण्यात आले होते.

सातारा पालिकेच्यावतीने सकाळी पालिका सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लहूजी वस्ताद आदी महापुरुषांच्या पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे,, नगरसेवक किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त पालिकेकडून दरवर्षी शाही मिरवणुकीचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मिरवणूक सोहळा रद्द करण्यात आला. ऐतिहासिक गांधी मैदानावर पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या देखाव्याने सर्वांचेच लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना मावळ्यांनी ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयघोष केला. या जयघोषाने शाहूनगरीत शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.

(चौकट)

पोलिसांचा खडा पहारा..

शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

(चौकट)

रांगोळीतून इतिहास जागा..

शिवजंयतीनिमित्ताने दारोदारी रांगोळी काढून अनेकांनी इतिहास जागृत केला. काहींनी अजिंक्यतारा आणि रायगडाची प्रतिकृती रांगोळीतून साकारली होती. किल्ल्याच्या प्रतिकृतीसारखी दरवाजाला सजावट करण्यात आली होती. काही ठिकाणी फुलांच्या साह्याने रांगोळी काढण्यात आली.

(चौकट) फोटो : १९ जावेद ०२

राजगड ते अजिंक्यतारा

१११ किलोमीटरची धाव

शिवजयंतीचे औचित्य साधून साताऱ्यातील डॉ. शुभांगी गायकवाड यांनी आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली. त्यांनी हाती शिवज्योत घेऊन राजगड ते अजिंक्यतारा ही १११ किलोमीटरची दौड पूर्ण केली. शुक्रवारी साताऱ्यात येताच त्यांचे शिवभक्तांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले.

(चौकट) फोटो : १९ जावेद ११

अशीही ‘शिव’भक्ती..

साताºयातील रिक्षाचालक सादीक शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. त्यांनी महिलांसाठी मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. सादीक शेख यांनी दाखविलेल्या या बांधिलकीचे शिवभक्तांनी भरभरून कौतुक केले.

(चौकट) फोटो : १९ पाणपोई

शिवभक्तांसाठी पाणपोई

शिवजयंतीनिमित्त सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी पोवई नाका येथे शिवभक्तांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेचा अनेक शिवभक्तांनी लाभ घेतला. प्रत्येक सातारकराला पिण्याचे मुबलक पाणी कसे मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून शिवभक्तांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याचे समाधान आहे, असे मत सिता हादगे यांनी व्यक्त केले.

फोटो : १९ जावेद खान २६

१९ पोवई नाका

Web Title: Avaghi Shahunagari Shivamay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.