जुलैमध्येच पावसाने गाठली सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:19+5:302021-07-28T04:40:19+5:30
कऱ्हाड तालुक्यात गत आठवड्यात पडलेल्या धुवाँधार पावसाने हाहाकार माजविला. २१ जुलैपासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर सलग चार दिवस तालुक्यात ...
कऱ्हाड तालुक्यात गत आठवड्यात पडलेल्या धुवाँधार पावसाने हाहाकार माजविला. २१ जुलैपासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर सलग चार दिवस तालुक्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यातच कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे कोयनेसह कृष्णा नदीला महापूर आला. या पुराचे पाणी नदीकाठच्या गावांतील अनेक घरांमध्ये घुसले. कृष्णा, कोयनेसह उत्तर मांड, दक्षिण मांड, वांग, तारळी या नद्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने रस्ते, घरे, पूल तसेच शेतीचेही नुकसान झाले. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी चार दिवसात झालेल्या पावसाने विक्रम केला असून, तालुक्यात सरासरीएवढा पाऊस झाला आहे.
यापूर्वी २१ जूनला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. एका दिवसात ८० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद त्यावेळी झाली होती. त्या पावसाने नदीची पाणी पातळी वाढली. मात्र, पूरस्थिती निर्माण झाली नव्हती. त्यानंतर एक महिना पावसाने उसंत घेतली आणि २१ जुलै रोजी पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अजूनही पावसाळ्याचे दोन महिने बाकी आहेत.
- चौकट
कऱ्हाड : ८५३
मलकापूर : ८४५
सैदापूर : ७९३
कोपर्डे हवेली : ७४८
मसूर : ६७४
उंब्रज : ७६९
शेणोली : ६६१
कवठे : ७४८
काले : ८०६
कोळे : ८६९
उंडाळे : ९११
सुपने : ९१०
इंदोली : ६०७
(सर्व आकडेवारी मिलिमीटरमध्ये)
- चौकट
तालुक्याचे पर्जन्यमान : ७६८.६० मिमी.
आजपर्यंत पडलेला पाऊस : ७४८.४६ मिमी.
- चौकट
एकूण पाऊस १०१९८ मिमी.
कऱ्हाड तालुक्यात तेरा मंडल असून, या सर्व मंडलात पावसाची नोंद ठेवली जाते. जून ते २६ जुलैपर्यंत तालुक्यातील सर्व मंडलात मिळून एकूण १० हजार १९८ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून, जुलैपर्यंत नोंदला गेलेला गत काही वर्षातील हा सर्वाधिक पाऊस आहे.