‘कुमुदा’च्या अविनाश भोसलेला अटक !
By Admin | Published: April 7, 2017 12:13 AM2017-04-07T00:13:27+5:302017-04-07T00:13:27+5:30
बनावट कागदपत्रे; ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे कोट्यवधी रुपये थकीतप्रकरणी चर्चेत असणाऱ्या बेळगाव येथील कुमुदा शुगर अँड अॅग्रो प्रोडक्टस लि.,चा अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश भोसले याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. रयत सहकारी साखर कारखान्याशी केलेल्या करारपत्रात जाणूनबुजून फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी कऱ्हाड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता दि. ९ एप्रिलपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेवाळेवाडी-म्हासोली येथील रयत सहकारी साखर कारखाना व बेळगाव येथील कुमुदा शुगर्स यांच्यामध्ये १९ सप्टेंबर २०१३ मध्ये साखर आयुक्तांच्या समोर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याबाबतचा करार झाला होता. या कराराची नोंदणी कऱ्हाड सबरजिस्टर यांच्याकडे करणे बंधनकारक होते. असे असताना करारपत्रातील पाने बदलून बनावट कागदपत्रे बनवून दि. ५ आॅक्टोबर २०१३ मध्ये सबरजिस्टर बेळगाव (कर्नाटक) यांच्याकडे याची नोंदणी केली. अशा बनावट नोंदणीचा आधार घेऊन अविनाश भोसले याने महाराष्ट्र शासनाची स्टॅम्प ड्यूटी बुडवली आहे. याप्रकरणी कारखान्याच्या वतीने २७ आॅगस्ट २०१५ रोजी कऱ्हाड न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्यात १५६/क प्रमाणे चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते.
बार्शी पोलिसांनी थकीत ऊसबिलप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी अविनाश भोसले याला अटक केली होती. कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी बार्शी न्यायालयाकडून त्याला ताब्यात घेऊन कऱ्हाड न्यायालयात हजर केले असता त्याला दि. ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबरोबर कऱ्हाड ग्रामीण पोलिसांकडे शेतकरी व वाहतूकदारांच्या आर्थिक फसवणुकीचे अनेक तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. त्याच्या चौकशीसाठीही अविनाश भोसले पोलिसांना हवा होता. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकरी व वाहतूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन कऱ्हाड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)