अविनाश मोहितेंचा जामीन फेटाळला
By admin | Published: March 17, 2017 11:22 PM2017-03-17T23:22:09+5:302017-03-17T23:22:09+5:30
बोगस कर्ज प्रकरणी एक महिन्यापासून अटकेत
कऱ्हाड : बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून गेल्या एक महिन्यापासून अटकेत असणारे कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचा जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला.
कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात तोडणी वाहतूकदारांची केवायसी कागदपत्रे वापरून व खोट्या सह्या करून सुमारे ५८ कोटी ६३ लाख ९ हजार ३७१ रुपयांचे बोगस कर्जप्रकरण केल्याचा आरोप आहे. त्याबाबतची तक्रार ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी कऱ्हाड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्याने माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना १३ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली.
त्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर बचाव पक्षाकडून जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर करण्यात आला.
यावर सुनावणी होऊन दोघांनाही जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर बचाव पक्षाने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी त्यावर सरकार पक्षाने युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)
जामीन मंजूर झाला तर दबाव : सरकारी वकील
‘कारखान्याच्या कर्जाशी वाहतूक कंत्राटदारांचा संबंध नाही. मात्र, कागदपत्राचा वापर करून बोगस प्रकरणे करून कर्ज रक्कम कंत्राटदारांच्या खात्यावर जमा न करता संघाच्या नावावर जमा करण्यात आली. बँकेने कर्जफेडीसाठी शेतकऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. जामीन मंजूर झाला तर अविनाश मोहिते व सुरेश पाटील यांच्यासह इतरजण वाहतूक कंत्राटदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन नामंजूर करावा,’ अशी मागणी सरकार पक्षाचे वकील अॅड. राजेंद्र शहा यांनी केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने अविनाश मोहिते व सुरेश पाटील यांचा जामीन फेटाळला.