कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:22+5:302021-04-16T04:40:22+5:30

रहिमतपूर : ‘कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनावश्यक गर्दी होऊ ...

Avoid crowds to stop Corona: Shambhuraj Desai | कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

Next

रहिमतपूर : ‘कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका,’ अशी सक्त सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांना केली.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे कोरोनासंदर्भात राबविण्यात आलेल्या उपाययोजना व प्रशासनामार्फत केलेल्या नियोजनाचा आढावा पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासनाकडून शंभूराज देसाई यांनी धावत्या भेटीदरम्यान घेतला.

शंभूराज देसाई यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांना रहिमतपूरमध्ये गर्दीचे प्रमाण किती टक्के आहे? पोलीस स्टाफ किती? होमगार्ड किती? नाकाबंदीचे पॉईंट किती व कोणते? आदी प्रश्न केले. गणेश कड यांनी रहिमतपूरमध्ये गांधी चौक, गोडावून नाका, आदर्श फाटा व बसस्थानक चौक या पॉईंटवर बंदोबस्त लावला असून, चोवीस तास नाकाबंदी सुरू असते. ३० पोलिसांसह २१ होमगार्डचा स्टाफ आहे. तसेच अत्यावश्यक कामांसाठीच केवळ १० टक्के लोक बाहेर असल्याने गर्दी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देसाई यांनी मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना शहरातील नियोजनाबाबत विचारणा केली. दळवी यांनी अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद असून, भाजी मंडई दोन ठिकाणी विभागून बसवली जाणार आहे. या ठिकाणी आखणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, नगराध्यक्ष आनंदा कोरे, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अविनाश माने, माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, अजित माने, मंडलाधिकारी विनोद सावंत, तलाठी प्रशांत सदावर्ते आदी उपस्थित होते.

चौकट :

लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा करा...

लॉकडाऊन काळात स्थानिक अडचणींबाबत शंभूराज देसाई यांनी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांना विचारणा केली. कोरे यांनी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने दुसऱ्यादिवशी लस आपल्याला मिळेल का नाही, या भीतीपोटी लसीसाठी लोक गर्दी करतात. तरी लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी केली. शंभूराज देसाई यांनी तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी जाधव यांच्याकडून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला कशा पध्दतीने लसींचा पुरवठा केला जातो, याची माहिती घेतली. तसेच रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मागणीप्रमाणे योग्य प्रमाणात लसीचा पुरवठा करावा, अशी सूचना केली.

फोटो ओळ : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील गांधी चौकामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरोनासंदर्भात आढावा घेतला. (छाया : जगदीप जाधव)

Web Title: Avoid crowds to stop Corona: Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.