डोनेशनवरून ‘डीजी’च्या गेटला टाळे
By admin | Published: July 9, 2015 10:48 PM2015-07-09T22:48:28+5:302015-07-09T22:48:28+5:30
‘मनसे’चे आंदोलन : धडक मोर्चा; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
सातारा : डोनेशन घेणाऱ्या संस्थांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून गुरूवारी येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या गेटला टाळे ठोकण्यात आले. ‘मनसे’च्या या धडक मोर्चात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.येथील गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयावर डोनेशनच्या मुद्यावरून ‘मनसे’ने धडक मोर्चा काढला होता. कॉलेजच्या गेटवर पोलीस आणि ‘मनसे’ पदाधिकाऱ्यांत जोरदार खडाजंगी झाली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गेटला टाळे ठोकले. त्यानंतर ‘मनसे’ व महाविद्यालयाच्या शिष्टमंडळातही जोरदार वादंग झाले.
यावेळी ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी डीजी कॉलेजच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली.
महाविद्यालय घेत असलेले डोनेशन तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा संबंधितांना काळे फासण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षण संस्थेने डोनेशन घेतल्यास शिक्षण सम्राटांना टार्गेट करण्यात येईल, असेही युवराज पवार यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमोल कांबळे, सागर पवार, राकेश पाटील, विजय वाणी, सागर बर्गे, विक्रम वाघ, अभय जाधव, स्वप्निल जाधव, अभिमन्यू देशमुख, सूरज जाधव, अक्षय मोरे, अविनाश घनवट, अर्जून पाटील, स्वप्निल पवार, तुषार चव्हाण, प्रकाश थोरात, प्रशांत पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)