नगराध्यक्षांच्या कक्षाला ‘प्रहार’ने ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:39 AM2020-02-26T00:39:04+5:302020-02-26T00:39:07+5:30
सायंकाळपर्यंत नगराध्यक्षांच्या कक्षाचे टाळे त्याचस्थितीत होते. त्यानंतर पंचनामा करून संबंधित कक्षाचे कुलूप काढण्यात आले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत प्रहार संघटनेच्या सतीश पाटील यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क-हाड : नगराध्यक्षांना जनतेच्या कामासाठी वेळ नाही, असा आरोप करीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या कक्षाला मंगळवारी दुपारी टाळे ठोकले. जर त्यांना जनतेसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिकाही यावेळी कार्यकर्त्यांनी घेतली.
दरम्यान, याप्रकरणी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सतीश पाटील यांच्यासह अन्य तिघांवर कºहाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नगराध्यक्षांचे स्वीय सहायक श्रीपाद देशपांडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड येथील दत्त चौकात भाजपच्यावतीने मंगळवारी सकाळी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिला अत्याचारात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या आंदोलनासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सतीश पाटील यांच्यासह तिघेजण पालिकेत पोहोचले. शहरातील वाखाण परिसर तसेच अन्य विभागातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी हे कार्यकर्ते त्याठिकाणी गेले होते. सर्वजण नगराध्यक्षांच्या कक्षाजवळ गेले असता त्या कक्षात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी नगराध्यक्षांचे स्वीय सहायक श्रीपाद देशपांडे यांनी त्यांना नगराध्यक्षा पक्षाच्या कार्यक्रमासाठी गेल्या असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘आम्ही त्यांच्या कक्षाला टाळे ठोकू,’ अशी धमकी दिली. तसेच नगराध्यक्षांना जनतेची कामे करण्यास आणि गाºहाणी ऐकून घेण्यास वेळ नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
याबाबत माहिती देण्यासाठी श्रीपाद देशपांडे हे पालिकेतील अधिकारी ए. आर. पवार यांच्या कक्षाकडे गेले. त्यांना माहिती देऊन देशपांडे परत येईपर्यंत संबंधित कार्यकर्ते नगराध्यक्षांच्या कक्षाला कुलूप लावून तेथून निघून गेले होते. घटनेची माहिती मिळताच क-हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली. सायंकाळपर्यंत नगराध्यक्षांच्या कक्षाचे टाळे त्याचस्थितीत होते. त्यानंतर पंचनामा करून संबंधित कक्षाचे कुलूप काढण्यात आले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत प्रहार संघटनेच्या सतीश पाटील यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्मचारी चार तास अडकला
प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नगराध्यक्षांच्या कक्षासमोर असताना पालिकेतील कर्मचारी यशवंत महादेव साळुंखे हे कक्षात काम करीत होते. त्यांना आतमध्ये कोंडूनच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कक्षाला बाहेरून कुलूप लावल्याचे फिर्यादित म्हटले आहे. कक्षाला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुलूप लावण्यात आले. सायंकाळी पाच वाजता ते काढण्यात आले. चार तास संबंधित कर्मचारी कक्षामध्येच अडकून होता.