यवतेश्वर घाटातील माकडांचा खाद्याऐवजी पाण्याकडेच ओढा

By admin | Published: April 16, 2017 10:42 PM2017-04-16T22:42:26+5:302017-04-16T22:42:26+5:30

बाटलीभर पाणी क्षणात फस्त : डोंगरात पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल

Avoid the monkeys' feed in the Yateshwar Ghat instead of water | यवतेश्वर घाटातील माकडांचा खाद्याऐवजी पाण्याकडेच ओढा

यवतेश्वर घाटातील माकडांचा खाद्याऐवजी पाण्याकडेच ओढा

Next



पेट्री : साताऱ्यातील पाऱ्याने शनिवार, रविवारी विक्रमच केला. चक्क ४१ अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडल्याने जीव कासावीस होत आहे. यवतेश्वर, कास, बामणोली येथील जंगलात पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. एका वानराने चक्क पर्यटकाने टाकलेल्या खाद्यपदार्थांकडे न पाहता पाण्याची अख्खी बाटली काही क्षणात पिऊन रिकामी केली.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील भाग हा जास्त पर्जन्याचा म्हणून ओळखला जातो. तसेच येथील वनसंपदाही समृद्ध आहे. कित्येक पशुपक्ष्यांचा वावर या परिसरात आहे. परंतु यंदाच्या हंगामातील उच्चाकी ४१ अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्मा तयार होत आहे. अंगाला उन्हाचे चटके बसत असताना ठिकठिकाणी भूगर्भातील पाणी आटल्याची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
शहराच्या पश्चिमेकडील भाग अतिवृष्टीचा असला तरी तीव्र डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी भूगर्भात न मुरता मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. बहुतांशी ठिकाणी असणारे तळी, झरे, पाणवठ्यावरील पाण्याचे प्रमाण अत्यल्प होत असून, काही ठिकाणी पाणी आटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
परिसरात झाडाझुडपांचा निवारा तसेच तोरणे, अंबुळगी, करवंदी, आळू, जांभळे हा रानमेवा पशुपक्ष्यांची भूक भागवत असला तरी पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना तहान भागवणे अवघड झाले आहे.
हे वास्तव भीषण चित्र या वानराकडे पाहिल्यावर लक्षात येते. खाद्यपदार्थ समोर ठेवला असतानाही त्याकडे न पाहता मिळालेल्या बाटलीतील पाणी गटागटा पिऊन पाण्याची बाटली काही मिनिटांतच रिकामी केली. या वानराला किती दिवसांची तहान लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अन्नाच्या शोधात भटकंती करणाऱ्या पशुपक्ष्यांना आसपास पाणी न मिळाल्यास जिवाची तडफड होते. कित्येक जिवांना प्रसंगी जीवही गमवावा लागत असावा. ही समस्या जाणून त्यांच्या भावना ओळखून शक्य असेल त्या ठिकाणी अनेकविध उपक्रमांतून काही प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सर्वांवर येऊन पडते. (वार्ताहर)
काही पर्यटकांनी माणुसकी
काही पर्यटकांनी रानमेव्याच्या शोधात त्यांची गाडी रस्त्यानजीक लावली असता झाडावर बसलेल्या वानरसेनेतील काही वानरं गाडीनजीक घुटमळू लागली. दरम्यान, खाऊचा पदार्थ समोर दिला असता वानर पदार्थाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यातील एकजण पाण्याचा घोट घेत असताना वानराचे पूर्ण लक्ष त्या पाण्याच्या बाटलीकडे होते. बहुतेक पाणी हवे असावे, ही त्या वानराची भावना ओळखून त्याच्या समोर पाण्याची बाटली ठेवली असता, कशाचीही भीती न बाळगता वानराने बाटली तोंडाला लावली अन् काही मिनिटांतच रिकामी केली. तहानेने व्याकूळ झाल्यानंतर पाणी प्यायला मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव काही वेगळेच सांगून जात होते.

Web Title: Avoid the monkeys' feed in the Yateshwar Ghat instead of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.