अवदशा कोरोना यंदाही माहेराच्या आड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:08+5:302021-05-16T04:38:08+5:30

सातारा : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हाबंदी आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसादसुध्दा ...

Awadsha Corona is still with Mahera! | अवदशा कोरोना यंदाही माहेराच्या आड!

अवदशा कोरोना यंदाही माहेराच्या आड!

Next

सातारा : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हाबंदी आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसादसुध्दा मिळत आहे. नवविवाहित मुलींना आपले माहेर दुरावल्याची खंत मनात सारखी बोचत आहे. अवदशा कोरोनाने यंदाही माहेर तोडलं, अशा भावना या सासुरवाशिणी व्यक्त करत आहेत.

सासरी नांदायला गेलेल्या लेकीचं माहेरपण करायला आईसह कुटुंबीय उत्सुक असतात. लग्नानंतर पहिले काही दिवस सणांच्या निमित्ताने वारंवार माहेरी येणारी लेक सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे पुढे कमी-कमी येत जाते. सासरची कर्तव्य पार पाडून मुलांच्या शाळांना सुट्टी लागली की, माहेरी येण्यासाठी विवाहितांना लग्न, बारसं, वास्तूशांत अशा कार्यक्रमांसह दिवाळी आणि उन्हाळी अशा दोनच सुट्यांमध्ये येणं शक्य होतं. कोविडच्या प्रादुर्भावामुळे अवघ्या २५ जणांमध्ये लग्न करण्याच्या झालेल्या निर्णयाने विवाहितांना या सोहळ्यात येणंही मुश्कील झालं आहे.

अनेक विवाहिता माहेरी असलेले आई, वडील व इतर मंडळींशी मोबाईलने जोडल्या जातात. कधी व्हिडीओ कॉल करून माहेरातील आठवणींना उजाळा देत आहेत.

कोट :

आई प्रतिक्रिया

१. आमची गौरी पुण्यात असते. अवघ्या दीड तासांच्या अंतरावर ती असली तरीही कोविड आणि तिची नोकरी यामुळे तिला माहेरी येणंच जमलं नाही. दिवाळीत केलेला उन्हाळ्यात येण्याचा वायदा कोरोनाने मोडीत काढला. मोबाईलवर भेट हाच पर्याय सध्या दिसतोय

- दीप्ती कुलकर्णी, व्यंकटपुरा पेठ

२. माझी एक लेक गोडोलीत तर दुसरी व्यंकटपुरा पेठेत आहे. कोरोना वाढत असल्यामुळे मुली घरी येत नाहीत. आमच्या वयामुळे त्यांचे माहेरपण कमी झालंय, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही हाक मारली तर लेकी नातवंडांसह घरी हजर होतील, हा विश्वास बळ देतो.

- सुरेखा मोरे, शाहूपुरी

३. लेकाच्या मुलाचं बारसं आम्ही नियोजित केलं होतं. घरगुती स्वरूपात बारसं करायला म्हणून ... राहणाऱ्या लेकीला आमंत्रण धाडलं. तर वाटेत पोलीस अडवतील म्हणून तिनं येणं रद्द केलं. यंदा लेकीला आणि नातवंडांना आंबेही देता आले नाहीत.

- रंजना निकम, काळोशी

सासुरवाशिण प्रतिक्रिया

१. माझं माहेर आणि सासर दोन्ही सातारा आहे. आमची घरंही अगदी शेजारच्याच पेठेत आहेत, तरीही महिनोंमहिने माहेरी जाणं होत नाही. कामानिमित्ताने घराबाहेर पडून काम केल्यानंतर वयस्क पालकांकडे जाणं म्हणजे त्यांना संकटात टाकण्यासारखं वाटतंय.

- नेहा भिडे-घाडगे, सासुरवाशिण

२. पूर्वी महिनाभर उन्हाळ्याची सुट्टी माहेरात जायची. पण आता संसारिक व्याप वाढल्याने माहेरी जाणं तासांवर आलंय. तळेगाव दाभाडे माहेर असल्याने कुटुंबियांसोबत मुंबईहून येताना थांबणं होतं. आई-बाबांसह भाऊ आणि वहिनीसोबत मोबाईलने कनेक्ट करून ठेवलंय.

- वैदेही करंबेळकर, सासुरवाशिण

३. आमचं पूर्ण कुटूंबच ग्लोबल आहे. भाऊ अमेरिकेत, आई लोणावळ्यात आणि एक भाऊ दिल्लीत असल्याने माहेरी जाणं, असा काही वेगळा सोहळा नसतोच. वेळ मिळेल आणि आईची गरज म्हणून तिला भेटायला जाणं होतं. पण हल्ली कामाशिवाय बाहेर पडतच नाही.

- रेणू राय येळगावकर, सासुरवाशिण

मुलांची प्रतिक्रिया

१. माझ्या आजी-आजोबांचं घर साताऱ्यात आहे. पण कोरोनामुळे आम्हाला तिकडं पाठवत नाहीत. आजी-आजोबांबरोबर फोनवर बोलतो पण दिवाळीनंतर त्यांची भेट नाही. रस्त्यावर पोलीस चौकशी करून पकडतील म्हणून आई-बाबाही तिकडं जाऊ देत नाहीत.

- चंद्रसेन फडतरे, कोरेगाव

२. साताऱ्यात अपार्टमेंटमध्ये राहात असल्यामुळे खूप कोंडल्यासारखं होतं. मामाच्या गावाला गेलं की भरपूर मजा करायला मिळते. शेतात जायचं, विहिरीत पोहायचं, आंबे उतरवायचे, असं सगळं करता येतं. पण यंदा कोरोना असल्यामुळे मामाकडे जाणे झाले नाही.

- श्रावणी जाधव, विलासपूर

३. आमचं गाव कारी असलं तरीही मी सध्या मुंबईत राहतोय. कुरूण हे माझ्या मामाचं गाव. आजोबांबरोबर गावात फिरणं, आजीबरोबर धार काढायला जाणं आणि मामाबरोबर मस्ती करणं हा उन्हाळ्यातील आमचा प्रोग्राम यंदा होईल, असं वाटत नाही.

- अथर्व मोरे, मुंबई

Web Title: Awadsha Corona is still with Mahera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.