औंधमध्ये ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत! : रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 06:56 PM2019-12-27T18:56:25+5:302019-12-27T18:59:14+5:30
अतिशय छोट्या खोल्यांमध्ये एकमेकांना खेटून कॉटस् टाकल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले व्हेंटिलेशन उपलब्ध केलेले नाही. कोणत्याही खोलीत एसी सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहेही अपुरी आहेत. सध्या याठिकाणी दहा कॉटवरच रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे.
औंध : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले असून, जुन्या इमारतीत रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. नवीन वर्षात तरी नवीन इमारतीत स्थलांतर होणार का? याकडे औंध पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागाने याबाबत तातडीने पावले उचलून रुग्णांसाठी ही नूतन इमारत खुली करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. कारण अपुºया सोयीसुविधा जागेची कमतरता यामुळे रुग्णांना अनेक अडीअडचणी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुन्या इमारतीमध्ये प्रचंड अडचण आहे. अतिशय छोट्या खोल्यांमध्ये एकमेकांना खेटून कॉटस् टाकल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले व्हेंटिलेशन उपलब्ध केलेले नाही. कोणत्याही खोलीत एसी सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहेही अपुरी आहेत. सध्या याठिकाणी दहा कॉटवरच रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे.
औंधसह ३५ गावांतील रुग्णांची व्यवस्थित सोय होईल, अशा प्रकारची भव्य इमारत उभी राहिली आहे. या इमारतीमुळे औंधच्या वैभवात आणखी भर पडली आहे. जुन्या व नवीन इमारतीसह एकूण येथे ३० कॉटस्ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मागील वर्षी काम रखडले होते. मात्र, आता इमारतीचे मुख्य दरवाजाचे, रंगरंगोटीचे, खिडक्यांचे त्याचबरोबर इतर अंतर्गत इंटिरियरचे पूर्ण झाले आहे. या इमारतीत रुग्णालय रुग्णांच्या दृष्टीने यामुळे चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पंचक्रोशीतील नागरिक असून, हे उद्घाटन रखडल्याने आतमध्ये पक्षी व प्राण्यांनी घाण करून टाकली आहे. नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यास औंध भागातील रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्यात झाला प्रचंड त्रास..
ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत अपुरी आहे. औंध परिसरातील येणाºया रुग्णांची संख्या पाहता लवकरच नवीन इमारतीत जाण्याची गरज आहे. पावसाळ्यात रुग्णासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
आमची हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. किरकोळ कामे, साफसफाई करून लवकरच नवीन इमारत हस्तांतर होईल. जास्त कालावधी जाणार नाही. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-एस. व्ही. पवार, शाखा अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग औंध