देखाव्यांतून प्रबोधनाचा जागर
By admin | Published: September 20, 2015 08:52 PM2015-09-20T20:52:13+5:302015-09-20T23:44:17+5:30
पेठा गजबजल्या : ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयांचा समावेश
सातारा : उत्सव साजरे करताना त्यातून समाजप्रबोधनही झाले पाहिजे, हा उद्देश लक्षात ठेवून यंदा साताऱ्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखावे केले आहेत. जिवंत व हलत्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत असून सायंकाळी देखावे पाहण्यासाठी शाहूनगरी गजबजून जात आहे.
भव्य देखाव्यांची परंपरा असलेल्या सातारा शहरातील पोवई नाका येथे पोवई नाका येथील शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘श्री कृष्णाचे विश्वरूप दर्शन’ हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे. पाच अश्व असलेल्या रथात अर्जुन विराजमान असल्याचे दाखविले आहे. तर रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाने धारण केलेले विश्वरूप असा हा भव्य स्वरूपातील हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिक्षक बँकेने गणपतीसमोर यंदा ‘बालशिवरायांचा न्यायनिवाडा’ हा विषय घेऊन भव्य हलता देखावा तयार केला आहे. एका पाटलाने केलेल्या दुष्कृत्याबद्दल त्याला बालशिवरायांनी केलेली शिक्षा या देखाव्यातून दाखविण्यात आली आहे.
विविध विषय घेऊन करण्यात आलेले देखावे पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटते. कर्मवीर पथावरील एका मंडळाने शिवालयाची प्रतिकृती तयार केली आहे. हिमालयात ध्यानस्थ बसलेले शंभूमहादेव असा हा भव्य देखावा विविधरंगी प्रकाशझोतात लक्ष वेधून घेत आहे. शाहू चौकात मल्हारी मार्तंड रूपातील गणेशमूर्ती लक्षवेधक आहे. जेजुरी गडाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून गडाबाहेर हातात तलवार घेऊन उभा असलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा यामुळे एक वेगळीच छाप पडत आहे. देखावे पाहण्यासाठी सातारकर घराबाहेर पडू लागले आहेत. (प्रतिनिधी)
रात्रीच्यावेळी रस्त्यांवर गर्दी...---शहरातील अनेक मंडळांनी भव्य देखावे तयार केले आहेत. ऐतिहासिक, पौराणिक देखावे पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. यंदा डॉल्बीचा गोंगाट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकही देखावे पाहण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.