‘एक गाव एक गणपती’साठी कोळे पोलिसांचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:50+5:302021-09-10T04:46:50+5:30

कुसूर : कराड तालुक्यातील कोळे पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोहीम राबवली ...

Awakening of Kole Police for 'Ek Gaon Ek Ganpati' | ‘एक गाव एक गणपती’साठी कोळे पोलिसांचे प्रबोधन

‘एक गाव एक गणपती’साठी कोळे पोलिसांचे प्रबोधन

Next

कुसूर : कराड तालुक्यातील कोळे पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोहीम राबवली जात आहे. त्याला स्थानिक मंडळाकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. तर काही गावांनी स्वत: पुढाकार घेऊन एक गाव एक मंडळ असा पवित्रा घेतला आहे. परिणामी मंडळांच्या एकीकरणामुळे गावात सौख्य नांदेलच; पण पोलीस प्रशासनाचाही ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना प्रत्येक गावात रुजवावी यासाठी प्रामुख्याने मंडळांनी पुढाकार घ्यावा. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून गावागावांत मंडळांच्या बैठकी घेऊन प्रयत्न केले जात आहेत. तर काही ठिकाणी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रयत्न केले जात आहेत. त्याला गणेश मंडळांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे.

पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावातील सर्व मंडळांचे पदाधिकारी एकत्रित करून सर्वांनुमते गावात एकच मंडळ एकच गणपती बसविण्यासाठी सर्वांनी एकमताने पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत. वृक्षारोपण, रक्तदान, फलकाद्वारे समाज प्रबोधनासारखे सामाजिक उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी ग्वाही सर्व मंडळांनी दिली. पोलीस निरीक्षक बिराजदार, उपनिरीक्षक रेखा दुधभाते, संग्राम फडतरे, अमोल देशमुख उपस्थित होते.

चौकट

कोळे पोलीस दूरक्षेत्रांतर्गत चाळीस गावांचा समावेश आहे. यामध्ये सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो. तर अठ्ठावीस पोलीस पाटील आहेत. पोलीस प्रशासन आणि पोलीस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावागावांत बैठका घेऊन एक गाव एक गणपती संकल्पना राबवली जात आहे. या वेळी बैठका झालेल्या गावातून मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सामाजिक अंतराचे पालन करणे अगदी महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रशासनासाठी नसून तुमच्या-आमच्या कुटुंबासाठी आहे. काही गावांतील मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अन्य गावातील मंडळे ही शासनाच्या नियमांचे पालन करतील. यासाठी स्थानिकांसह पोलीस पाटील यांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

-रेखा दुधभाते, पोलीस उपनिरीक्षक, कोळे

Web Title: Awakening of Kole Police for 'Ek Gaon Ek Ganpati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.