कोरोनाशी लढण्यासाठी संयमाचे शस्त्र गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 09:15 PM2020-05-16T21:15:44+5:302020-05-16T22:28:37+5:30

कोरोना या वैश्विक महामारीशी सामना करत असताना वैज्ञानिक कृतींचा जागर करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही अफवेला, अंधश्रद्धा उपचारांना कोणीही बळी पडू नये. विवेकी विचारांतून संयम प्राप्त होतो. हा संयम प्रत्येकाने बाळगायला हवा. - प्रशांत पोतदार, राज्य प्रधान सचिव, अंनिस

Awakening of scientific thought from ‘Annis’ | कोरोनाशी लढण्यासाठी संयमाचे शस्त्र गरजेचे

कोरोनाशी लढण्यासाठी संयमाचे शस्त्र गरजेचे

Next
ठळक मुद्दे‘अंनिस’कडून विज्ञानवादी विचारांचा जागरप्रत्यक्ष भेटी घेता येत नसल्या तरी तंत्रज्ञानाचा वापर करून आॅनलाईन संवाद व प्रशिक्षण

सागर गुजर ।

कोरोनाच्या संकटात सापडलेल्यांना काही महाभाग आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक शोषण करतायत. अशा नाठाळांच्या माथी काठी मारण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती निष्ठेने करत आहे. विवेकी विचार, शास्त्रशुद्ध चिकित्सा अन् विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून या कार्याला पुढे न्यायला हवं...

प्रश्न : कोरोनाच्या महामारीत ‘अंनिस’चे काम कसे सुरू आहे?
उत्तर : खरंतर कोरोनाच्या परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची किती मोठी गरज आहे, हे प्रकर्षानं पुढं आलंय. प्रत्यक्ष भेटी घेता येत नसल्या तरी तंत्रज्ञानाचा वापर करून आॅनलाईन संवाद व प्रशिक्षण घेतले जात आहेत.

प्रश्न : अंधश्रद्धेचे नवीन प्रकार उघडकीस आलेत का?
उत्तर : अर्थातच.. या महामारीच्या काळात बरेच फसवे प्रकार सोशल मीडियावर चालू आहेत. अवैज्ञानिक आणि दैवी उपचाराने कोरोना जातो, असा फसवा प्रचार भारतभर सुरू आहे. लांब कशाला आपल्या साताऱ्यात देखील गळ्यात हळकुंड बांधल्याने कोरोना होत नाही, अशी अंधश्रद्धा पसरलीय. थाळ्या वाजवून अन् दिवे लावण्याचे कृत्य खुद्द देशाचे पंतप्रधान जनतेला करायला लावतायत, याचा ‘अंनिस’ने निषेध केलेला आहे.

प्रश्न : मद्यविक्रीला परवानगीबाबत ‘अंनिस’ची भूमिका काय आहे?
उत्तर : अंधश्रद्धा आणि व्यसन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘अंनिस’ची ‘चला व्यसनाला बदनाम करुया,’ ही प्रबोधन मोहीम आहे. तसेच तो आमच्या कामाचा एक भाग आहे. अशा महामारीच्या प्रसंगी तर केवळ महसुलाचे कारण पुढे करून मद्य विक्रीला परवानगी देणे आणि तीही घरपोच, याचा जाहीर निषेध अंनिसने निर्भयपणे नोंदवला आहे.


गैरफायदा घेणाऱ्यांचे पीक
कोरोनाच्या वातावरणात भयभीत लोकांचा फायदा घेणाऱ्यांचे पीक फोफावले आहे. काही ज्योतिषी व मांत्रिक, तांत्रिक या घटनेला ग्रहगोल यांची आकाशातील स्थिती कशी जबाबदार आहे, असा अशास्त्रीय दावा आता करू लागलेत. काही चॅनेलवर तर होम हव यासारखे प्रकार सुरू आहेत. देवदूतांप्रमाणे काम करणाºया नर्स, डॉक्टर यांनाच वाळीत टाकण्याचे प्रकार घडले आहेत.


कार्यकर्ते जोमाने लढाई लढतायत
विचारांनी लढणाऱ्या नेत्याला गोळ्या झाडून मारले; पण कार्यकर्ते डगमगले नाहीत. पूर्णत: संयमाने आणि विवेकाने हे काम महाराष्ट्रभर आजही जोमाने सुरूच आहे. अंनिसचे कार्यकर्ते ‘कोव्हिड योद्धे’ म्हणून प्रशासनासोबत मदतीचे काम करत आहेत. संघटनेच्या राज्य, जिल्हा व शाखा यांच्या बैठका आॅनलाईन सुरू आहेत. मनोबल, मानसमित्र या हेल्पलाईनद्वारे मोफत मानसिक आधार दिला जातो.

Web Title: Awakening of scientific thought from ‘Annis’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.