पुरस्कारप्राप्त गावाला म्हणे नावच बदलायचंय--गाव बदललं, नाव बदलायचंय

By admin | Published: February 13, 2015 12:09 AM2015-02-13T00:09:27+5:302015-02-13T00:50:25+5:30

वाड्यांना लागले नामकरणाचे वेध! जखिण‘वाडी’ नको, जखणापूर म्हणा : प्रस्ताव अडकला लालफितीत; सरपंच नाचवतायत कागदी घोडी,

The award-winning village is supposed to change the name - the village changed, the name should be changed | पुरस्कारप्राप्त गावाला म्हणे नावच बदलायचंय--गाव बदललं, नाव बदलायचंय

पुरस्कारप्राप्त गावाला म्हणे नावच बदलायचंय--गाव बदललं, नाव बदलायचंय

Next

संजय पाटील --- कऱ्हाड नावात काय आहे, असं म्हणतात; पण कधी-कधी कर्तृत्व मोठं असलं तरी नेमकं नावातच घोडं अडतं. इच्छा नसली तरी त्यावेळी नाव बदलावसं वाटतं. कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी या पुरस्कारप्राप्त गावाचंही सध्या तेच झालंय. या गावाने राज्यपातळीवरील पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय; पण सध्या हेच नाव ग्रामस्थांना नकोस झालंय. जखिण‘वाडी’ऐवजी गावाला ‘जखणापूर’ नाव देण्यात यावं, असं ग्रामसभेचं म्हणणं. तसा प्रस्तावही जिल्हा परिषदेकडे गेलाय. वाई तालुक्यातील ‘चोराचीवाडी’ या महसुली गावाचा काही दिवसांपूर्वीच नाव बदल झाला. गावाचं अपमानास्पद नाव बदलण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या वीस वर्षांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं. ‘चोराचीवाडी’ आता ‘आनंदपूर’ बनलं. चोराचीवाडी गावाप्रमाणेच जिल्ह्यातील इतर काही गावांचे नाव बदलाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेत सध्या धूळखात पडलेत. संबंधित गावातील ग्रामस्थांना आपल्या गावाचं नाव का बदलायचंय, याचा ज्यावेळी ‘लोकमत’ने शोध घेतला, त्यावेळी भन्नाट कारणे समोर आली. इतर गावांप्रमाणेच जखिणवाडीच्या ग्रामस्थांना आपल्या गावाचं नाव बदलायचंय. ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती यासह विविध अभियानांमध्ये या गावानं तब्बल पंधरा पुरस्कार मिळवलेत; पण तरीही येथील ग्रामस्थांना ‘जखिणवाडी’ऐवजी ‘जखणापूर’ नाव आपल्या गावासाठी योग्य वाटतंय. ‘वाडी’ म्हटलं की, पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो, असंच ग्रामस्थांचं मत. मात्र, सरपंचांनी नाव बदलामागचं वेगळंच कारण समोर ठेवलं. आमच्या गावाचं नाव तसं चांगलं आहे. मात्र, नावामुळे थोडासा ‘प्रॉब्लेम’ होतोय. सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील सांगत होते. ‘कऱ्हाडप्रमाणेच खानापूर तालुक्यात जखिणवाडी नावाचं गाव आहे. त्यामुळे आमच्या गावातील महत्त्वाची पत्रं त्या गावात जातायत. पै-पाहुण्यांचं टपालं, मुलांची शाळा व कॉलेजची पत्रं एवढंच नव्हे नोकरीची नियुक्तीपत्रही खानापूर तालुक्यातील जखिणवाडीला गेली. तेथून ती परत आमच्याकडे आली. मात्र, तोपर्यंत बरेच दिवस उलटल्यामुळे नोकरी, शाळा, कॉलेजची कामे झाली नाहीत.’ २०११ मध्ये गावाचं नाव बदलण्याचा विषय ग्रामसभेमध्ये आला, त्यावेळी काय नाव द्यावं, या प्रश्नानंही डोकं वर काढलं. गावात जखणाई देवीचं पुरातन मंदिर. या देवीच्या नावावरूनच गावाला ‘जखिणवाडी’ हे नाव पडलेलं. त्यामुळे गावाच्या नावात जखणाईदेवीचा उल्लेख असावा, अशी ग्रामस्थांची मनोमन इच्छा. त्यामुळे बदलण्यात येणाऱ्या नावाबाबत चांगलीच चर्चा झाली. अखेर ‘जखणापूर’ हे नाव निश्चित झालं. ग्रामसभेत तसा ठराव झाला. प्रस्ताव तयार झाला. तो शासन दरबारीही पोहोचला. मात्र, गेली चार वर्षे या प्रस्तावाबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. गावाचं नाव बदलण्यास महसूल विभाग अनास्था दाखवित असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ( क्रमश:) पंधरा पुरस्कारांवर ‘जखिणवाडी’चं नाव जखिणवाडी गावाने चार वर्षांत तब्बल पंधरा पुरस्कार मिळवलेत. त्यामध्ये २०१० मध्ये निर्मलग्राम, २०११ मध्ये आदर्श ग्राम, २०१२ मध्ये पर्यावरण समृद्ध गाव, संत गाडगेबाबा अभियान कऱ्हाड तालुक्यात प्रथम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार, दिवंगत वसंतराव नाईक पाणी व सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, यशवंत पंचायत राजमध्ये कऱ्हाड तालुक्यात प्रथम, २०१३ मध्ये गौरव ग्रामसभेस मानांकन तसेच विकासरत्न पुरस्कार, २०१४ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरीय प्रथम, संत गाडगेबाबा अभियान पुणे, विभागात द्वितीय व २०१५ मध्ये यशवंत ‘पंचायत राज’मध्ये जखिणवाडीने जिल्ह्यात प्रथम मिळविला आहे. राज्यसभा सदस्य आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडून आम्ही आमच्या गावासाठी निधी मिळवलंय. पाच वर्षांपूर्वीची आणि आत्ताची जखिणवाडी यामध्ये खूप मोठी तफावत आहे. गावाचा चेहरामोहरा बदललंय. आता गावाचं नाव बदलावं एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे. - महेश गुरव, उपसरपंच जखिणवाडी नावामुळे प्रशासकीय पातळीवर आम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामस्थांची टपालाद्वारे येणारी महत्त्वाची कागदपत्रं वेळेवर पोहोचत नाहीत. खानापूर तालुक्यातील जखिणवाडीला ही कागदपत्रं जातात. त्यामुळे गावाचं नाव बदलावं, असा प्रस्ताव आम्ही पाठवलंय. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होतंय. - रामचंद्र पाटील, माजी सरपंच

Web Title: The award-winning village is supposed to change the name - the village changed, the name should be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.