वडूजच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:01+5:302021-02-26T04:53:01+5:30
वडूज : वडूजमध्ये दुचाकीसह चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत शहरात अपुऱ्या पडत असलेल्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे वाहने लावण्यासाठी ...
वडूज : वडूजमध्ये दुचाकीसह चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत शहरात अपुऱ्या पडत असलेल्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे वाहने लावण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर होऊ लागला आहे. अरुंद रस्त्यावरील पार्किंगमुळे अपघातांना मात्र निमंत्रण मिळते आहे. शहरातील रहदारीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरच वाहने पार्क केल्याने प्रसंगी छोटे-मोठे अपघातही होत आहेत.
वडूज शहराचा विस्तार वेगाने होत असला तरी मुख्य बाजारपेठेसह शहर परिसरात अरुंद रस्ते व त्या पटीत वाहनांची अधिक वर्दळ नेहमीच असते. तालुक्याचे मुख्यालय हे वडूज शहर असल्याने शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व दवाखाने यासाठी दररोज ये-जा करणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. सर्वच रस्त्यांवर दिसेल त्या ठिकाणी वाहने लावली जात आहेत. वडूज शहरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने सध्या तरी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत.
छोटे-मोठे व्यावसायिक व दुकानदारांच्या दुकानासमोरच वाहने लावल्याने दुकानदार व वाहनचालकांत वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. बसस्थानक परिसर, बाजार पटांगण, दहिवडी-कऱ्हाड रस्ता, शेतकरी चौक व मुख्य बाजारपेठ या परिसरातील काही भागातही दिसेल तेथे दाटीवाटीने रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने अपघाताच्या घटना घडतच आहेत.
केवळ वडूज शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही काहीशी अशीच स्थिती आहे. खटाव तालुक्यातील प्रमुख मार्गावर बंद पडलेली भंगार झालेली वाहने पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरीले ही जीवघेणी पार्किंग बंद करून संबंधित विभागाकडून वाहनधारक व दुकानदार यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
चौकट
सम-विषमचा प्रस्ताव धूळ खात
नगरपंचायत प्रशासनाकडून सम-विषम पार्किंगचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच पोलीस विभागाकडे सादर झाला आहे. मात्र यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. नेमकी माशी कोठे शिंकते आहे हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
२५वडूज-पार्किंग
वडूज शहरात वाहने उभी करण्यास जागा नसल्याने मिळेल तेथे दुकाने, बँकांसमोर वाहने उभी केली जात आहेत. (छाया : शेखर जाधव)
फोटो ... वडूज शहरातील रस्त्यालगतच अस्ताव्यस्त लागलेल्या गाड्या. (शेखर जाधव )