साताऱ्यात आयुर्वेदिक गार्डन उभारणार
By admin | Published: March 11, 2015 11:08 PM2015-03-11T23:08:27+5:302015-03-12T00:02:23+5:30
उदयनराजे : दीड कोटीच्या निधीची तरतूद
सातारा : ‘सातारा शहरात दोन एकर परिसरात अत्याधुनिक पद्धतीने आयुर्वेदिक गार्डन साकारण्यात येणार असून, विविध प्रकारचे वॉकिंग ट्रॅक पथ, वनौषधींची लागवड, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांकरिता सुसज्य अभ्यासिका उभारण्यात येणार असून यासाठी १३ व्या वित्तआयोगामधून केंद्राच्या माध्यमातून दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे,’ अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. ज्येष्ठांसाठी ग्रंथालय, याबरोबरच मन:शांतीसाठी शास्त्रीय दृष्टिकोनामधून उभारण्यात येणारे पिरॅमिडस आदी वैशिष्ट्यांचा समावेश या आयुर्वेदिक गार्डनमध्ये आहे. बाग-बगीच्याच्या सुविधांमुळे मन प्रफुल्लित होण्याबरोबरच विरंगुळा मिळण्याचे ठिकाण नागरिकांना उपलब्ध व्हावे आणि शास्त्रीय दृष्टिकोनामधून बागबगीचा निर्माण व्हावा. या हेतूने सातारा शहरात नगरपरिषदेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यामंदिरासमोरील सुमारे दोन एकर जागेत आयुर्वेदिक उद्याननिर्मितीबाबत पालिकेला सुचवून केंद्राकडे जरूर तो पाठपुरावा केला होता. या आयुर्वेदिक गार्डनमध्ये वॉकिंग ट्रॅकमध्ये, आरोमा पाथ, मड पाथ, सॅन्ड पाथ, कोल्ड व हॉट वॉटर पाथ अशा वेगवेगळ्या उपयुक्त ट्रॅकची करण्यात येणारी उभारणी वेगवेगळ्या स्वरूपाची आयुर्वेदिक ट्रिटमेंट विविध आजारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच मेडिटेशनसाठी खास पद्धतीचे अत्याधुनिक पिरॅमिडस उभारण्यात येणार आहेत. तसेच लेसर शो, संगीत कारंजे आदींचा या गार्डनमध्ये समावेश आहे.तरुणांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या अभ्यासाठी दर्जेदार अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी पुस्तकांचा खजाना असलेले सुसज्य ग्रंथालय, लहान मुलांसाठी खेळण्याकरिता लॉन, तसेच आधुनिक खेळणी, आयुर्वेदिक वनौषधींची आणि वृक्षांची सूक्ष्म नियोजनानुसार लागवड केली जाणार आहे.या गार्डनची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (प्रतिनिधी)
शहराच्या लौकिकात भर
साताऱ्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचे सुसज्ज असे आयुर्वेदिक गार्डन उभारले जाणार आहे. हा प्रकल्प बहुदा महाराष्ट्रातील पहिला असू शकतो. आत्तापर्यंत अशाप्रकारे सुखसोयीने साताऱ्यात एकही ठिकाण नाही. या गार्डनमुळे साताऱ्याच्या लौकिकात भर पडणार आहे. विशेषत: ज्येष्ठांना आणि लहान मुलांना सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी व खेळण्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या पाडव्याच्या दिवशी कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. असेही खासदार उदयनराजे यांनी सांगितले.