भाजपला रोखण्यासाठी बाबा-काका गट एकत्र-: तिढा सुटला; राष्ट्रवादीसह सर्व उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:21 AM2019-01-10T00:21:29+5:302019-01-10T00:21:45+5:30
मलकापूर : येथील पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गेली अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडी व चर्चांना उधाण आले होते. उमेदवारी अर्ज दाखल ...
मलकापूर : येथील पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गेली अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडी व चर्चांना उधाण आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. राजकीय घडामोडी घडून दोन्हीही गटाचे नेते एकत्र आले. त्यामुळे बाबा व काका गट एकत्र येणार, या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. तर राष्ट्रवादीलाही बरोबर घेत काँग्रेसने त्यांना निवडणुकीत एक जागा दिली आहे.
मलकापूर पालिकेच्या निवडणुकीचे वारे सुरू झाल्यपासून अनेक चर्चा सुरू होत्या. आत्तापर्यंतच्या सगळ्या चर्चेत बाबा-काका एकत्र येणार का? किंवा भाजपा काय धमाका करणार? याबाबत मलकापूरसह तालुक्यात उत्सुकता लागली होती. त्यामुळे निवडणुकीत कोण कोणाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार? कोण स्वतंत्र लढणार? या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चा व घडामोडींना बुधवारी पूर्णविराम मिळाला. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपासून बाबा-काका गटाच्या मनोमिलनाचे वारे वाहू लागले होते. मात्र त्यावर दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे कोणीही जाहीर घोषणा केली नव्हती. अनेकवेळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळीही बाबा-काका गटाचे मनोमिलन झाले, असे जाहीरपणे बोलले जात नव्हते. मात्र, निवडणुकीत दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होत्या.
निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर जागा वाटपावरून दोन्ही गटांमध्ये पुन्हा संबंध ताणले होते. अखेर काँग्रेसच्या चिन्हावर एकत्रित निवडणूक लढत असताना काही जागांवर उमेदवारी देऊन मनोमिलनावर शिक्कामोर्तब केला. त्यामध्ये उंडाळकर गटाने कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या दोन उमेदवारांना निवडणुकीत उतरवले आहे. दुसरीकडे अॅड. राजाभाऊ उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीलाही बरोबर घेत काँग्रेसने त्यांना निवडणुकीत एक जागा दिली आहे. जरी एक उमेदवार राष्ट्रवादी समर्थक असला तरी तो काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीत उतरणार आहे.
त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन मलकापूर पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी अर्ज दाखल करत असताना झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीला बरोबर घेत बाबा-काका गट एकत्रितपणे हाताच्या चिन्हावर मैदानात उतरला आहे. त्यामुळे बाबा व काका गटाच्या मनोमिलनाची खºया अर्थाने सुरुवात मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतून झाल्याचे स्पष्ट झाले.
अखेरच्या क्षणात तिघेजण भाजपात
मलकापूरच्या निवडणुकीत राजकीय घडामोडीत नाराजी नाट्य घडले. काहीही झाले तरी आपण काँग्रेसबरोबर जाण्याचे ठरवले, तसा आदेशही काढला. मात्र उंडाळकर गटाचे सुहास कदम, राजू मुल्ला तर आमदार बाळासाहेब पाटील गटाचे प्रमोद शिंदे यांनी आपल्या नेत्यांचे आदेश डावलत भाजपमधून उमेदवारी मिळवली आहे.
मलकापूर पालिका निवडणुकीसाठी पृथ्वीराजबाबा आणि उंडाळकरकाका गट एकत्र आले. बुधवारी अॅड. उदयसिंह पाटील, राष्ट्रवादीचे अॅड. राजाभाऊ पाटील, काँग्रेसचे मनोहर शिंदे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देत हातमिळवणी केली. मलकापूरच्या आजपर्यंतच्या राजकारणातल्या या मोठ्या घडामोडी आहेत.