बाबाराजे म्हणाले,‘ हवं तर माझे कान धरा!’

By admin | Published: October 27, 2014 09:42 PM2014-10-27T21:42:03+5:302014-10-27T23:44:55+5:30

‘दगड’ विधान मागे : जनतेवर नव्हे तर निवडणुकीत खेळी करणाऱ्यांवर नाराज

Babaraj said, 'If you want, hold my ear!' | बाबाराजे म्हणाले,‘ हवं तर माझे कान धरा!’

बाबाराजे म्हणाले,‘ हवं तर माझे कान धरा!’

Next

सातारा : ‘शहरात मला अपेक्षित मतदान पडले नाही, त्याचे आत्मपरीक्षण आम्ही केले आहे. याबाबत कोणालाही दोष देत बसणार नाही. नागरिकांनी मतपेटीच्या माध्यमातून माझा कान पकडला. हेच काम करताना त्यांनी निवडणूक येईपर्यंत वाट पाहू नये. सातारकरांना माझ्याकडून संयमाची अपेक्षा आहेत. तो मी राखणार आहे. लोकांनी निवडणुकीआधी हवे तर माझा कान पकडावा,’ अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाराज होत ‘माझे हात दगडाखाली होते, आता दगड माझ्या हातात आहे.’ अशा शब्दात ही नाराजी व्यक्त केली होती. हे विधान मागे घेत त्यांनी आज ‘माझ्याकडून काम करताना चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी मला संधी द्या,’ अशी विनंती जनतेला केली.
दरम्यान, खेळ्या करणाऱ्यांना पालिका निवडणुकीत जागा दाखविणार का? या प्रश्नाबाबत त्यांनी निवडणुकीआधी सगळेच समजेल, असेही सूचकपणे सांगितले. नगरपालिकेचे कामकाज करताना माझ्या एकट्याची सत्ता तिथे नाही. दोन्ही आघाड्यांना विश्वासात घेऊन कामे करावी, लागतात, असे सांगत त्यांनी आपला रोष सातारा विकास आघाडीवरही असल्याची जाणीव करुन दिली.
आमदार भोसले म्हणाले, ‘काही समस्या राहिल्यानेच लोक नाराज होते. त्यांना माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्यातलाच एक आहे. निवडणूक निकालानंतर मी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती व्यक्त करायला नको होती, अशा भावना माझ्याजवळ अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. सातारा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. येथील बोगदा परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून व्यावसायिक आणि झोपडपट्टीवासीयांना दमदाटी करून हप्ता वसुली, खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा समाजविघातक गुंडप्रवृत्तींची दहशत मोडीत काढून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत.
बोगदा परिसरात काही गुंड आणि गुन्हेगारांनी नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही समावेश आहे. दहशत माजवून झोपडपट्टीवासीयांसह छोटे-मोठे व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिकांना धमकावणे, मारहाण करून त्यांच्याकडे खंडणी, हप्त्याची मागणी करणे, अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अशा लोकांच्या कारवायांना प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. पोलीस कारवाई करण्याऐवजी राजकीय दबावाचे कारण पुढे करून अशा गुंडांना अभय देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. भीतीपोटी नागरिक अशा गुंडांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. पोलीस मात्र तक्रार नसल्याचे कारण पुढे करत कारवाई करण्याचे टाळतात.’ (प्रतिनिधी)

बोगद्यातील गुंडांचा बंदोबस्त करा
बोगदा परिसरातील गुंडगिरीविरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही दंड थोपटले आहेत. दमदाटी, हप्ता वसुली, खंडणीखोरांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या मतदार संघामध्ये असणाऱ्या गुंडगिरीविरोधात रणशिंग फुंकले होते. यानंतर लगेचच शिवेंद्रराजेही गुन्हेगारीविरोधात आक्रमक झाल्याचे दिसले.‘नागरिकांची सुरक्षा आमच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे अशा गुंड आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना कोणीही पाठीशी घालणार नाही, याची जाणीव ठेवून पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करावी,’ असेही ते म्हणाले.

Web Title: Babaraj said, 'If you want, hold my ear!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.