आता शोध बेबी पाटणकरचा...
By Admin | Published: March 13, 2015 11:25 PM2015-03-13T23:25:46+5:302015-03-13T23:54:19+5:30
एमडी तस्करी प्रकरण : धर्मराजचा रक्तदाब वाढला
खंडाळा : कण्हेरी (ता. खंडाळा) येथे मुंबई पोलीस दलातील हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडे ११३ किलो व मुंबई येथे मरिन ड्राईव्ह पोलीस चौकीतील त्याच्या लॉकरमध्ये १२ किलो अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. मुंबईतून परागंदा झालेली ‘ड्रग पेडलर’ बेबी ऊर्फ शंकुतला पाटणकर हिच्याशी धर्मराजचे अनेक वर्षे घनिष्ट संबंध असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई क्राईम ब्रँच व सातारा पोलीस तसेच मुंबई पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक बेबी पाटणकरच्या शोधात आहे.खंडाळा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या धर्मराज काळोखे याने रक्तदाबाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला खंडाळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी व औषधोपचारांनंतर पोलिसांनी त्याची रवानगी पुन्हा खंडाळ्याच्या कोठडीत केली. बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे याचे अनेक वर्षांपासून संबंध असून, यामधूनच काळोखे हा अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतला असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. मात्र, धर्मराज काळोखे पोलिसांना उडवाउडवीची उत्तर देऊन संभ्रम निर्माण करीत असल्याचीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख खंडाळा पोलीस ठाण्यात आज दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. धर्मराज काळोखे याने कोठे-कोठे वास्तव्य केले, याचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक रात्री उशिरा रवाना झाले. तत्पूर्वी अधीक्षक डॉ. देशमुख, यांनी तपासी अधिकारी दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंंगटे यांच्याबरोबर सुमारे तीन तास कमराबंद चर्चा केली.
तरुणांचा ‘म्याव म्याव’
मेफॅड्रॉन अर्थात एमडी या अमली पदार्थाच्या विक्रीच्या दृष्टीने ‘म्याव म्याव’ हा सांकेतिक शब्द तस्करांच्या गोटात रूढ असून, हा अमली पदार्थ बाळगायला सोपा असल्याने विशेषत: तरुणवर्गात ‘म्याव म्याव’ या नावाने प्रसिध्द आहे.