बाजरी पेरणीकडे पाठ; तेलबियांकडे कल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:27+5:302021-06-26T04:26:27+5:30
आदर्की : फलटण तालुक्यात खरीप हंगामात बाजरीचे मुख्य पीक होते; पण गतवर्षीपासून बाजरीस कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीकडे पाठ ...
आदर्की : फलटण तालुक्यात खरीप हंगामात बाजरीचे मुख्य पीक होते; पण गतवर्षीपासून बाजरीस कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीकडे पाठ फिरवली असून, सोयाबीन, सूर्यफूल, मूग, घेवडा व चवळी या तेलबिया व कडधान्य पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
फलटण तालुका रब्बीचा असला तरी खरीप हंगामात शेतकरी बाजरी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात करीत असे. त्या वेळी कडधान्य अल्प प्रमाणात पेरणी करीत होते. गतवर्षीपासून लॉकडाऊन असल्याने मार्केट कमिटी व आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांकडे बाजरी पडून आहे, तर बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. त्यामध्ये केंद्र शासनाकडून तांदूळ, गहू मोफत दिला जात आहे, तर विद्यार्थी घरी आहेत त्यांना कोरडा पोषण आहार मिळत असल्याने बहुतांशी कुटुंबास धान्य विकत घ्यावे लागत नाही, त्याचा परिणाम बाजरीच्या दरावर झाला आहे.
फलटण तालुक्यातील हिंगणगाव, सासवड, बिबी, आदर्की परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीकडे पाठ फिरवली आहे. त्याऐवजी भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या तेलबिया व मूग, चवळी, घेवडा, उडीद, पावटा, मटकी आदी कडधान्याची पेरणी केली आहे.
२५आदर्की
आदर्की परिसरात खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे.