गाडी मागे घे बोलला अन् ‘इगो’ दुखावला; दोन गोळ्या झाडल्या, सहा जणांवर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: December 28, 2023 08:13 PM2023-12-28T20:13:40+5:302023-12-28T20:14:45+5:30
कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला.
सातारा: येथील कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यानंतर एका तरुणाने दुचाकीस्वाराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने या गोळ्या संबंधित तरुणाला लागल्या नसून, यात तो बालंबाल बचावला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज ढाणे (रा. मंगळवार पेठ, सातारा), हर्षद शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्यासह चार अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कमानी हौदाजवळ गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हर्षद शेख हा काही तरुणांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी रस्त्यात आडवी उभी केली होती. विशाल अनिल वायदंडे (वय २७, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दुचाकीवरून तेथून जात होता. त्यावेळी त्याने हर्षदला दुचाकी बाजूला घे, असे सांगितले. तेव्हा त्याने घेणार नाही, तुला काय करायचे तर कर, असं सांगितल्यानंतर विशाल याने त्याची दुचाकी दुसऱ्या बाजूने रस्त्याच्याकडेने काढून तो तेथून निघून गेला.
पानटपरीजवळ ठेवलेला मावा घेऊन तो परत तेथून जात असताना हर्षदने त्याला थांबवले. थांब तुला दाखवतो, असे म्हणत त्याने धीरज ढाणे याला फोन केला. काही वेळातच ढाणे त्याच्या काही मित्रांना घेऊन तेथे आला. त्याने विशाल याला मारहाण करण्यास सुरुवात केली. विशालसोबत असलेला त्याचा मित्र विक्रम यादव हा वाद सोडवत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली. विक्रमने ‘तू पळून जा,’ असं म्हणत विशालला ढकलले. त्यानंतर विशाल पळून जात असताना धीरज ढाणे याने त्याच्याकडील पिस्तुलामधून दोन गोळ्या त्याच्या दिशेने झाडल्या. मात्र, सुदैवाने त्या गोळ्या विशालला लागल्या नाहीत. अंधारात एका घराच्या आडोशाला विशाल लपून बसला. रात्रीचा दंगा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. हे दिसताच धीरज ढाणे, हर्षद शेख व त्याचे इतर साथीदार तेथून पसार झाले.
विशाल वायदंडे याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हर्षद शेख, धीरज ढाणे याच्यासह सहा जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपींच्या शोधासाठी पथक तैनात
गोळीबाराची घटना सातारा शहरात घडल्याचे समजताच शहरात प्रचंड खळबळ उडाली. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आले असून, लवकरच संबंधित आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले.