बनगरवाडी कुटुंबांचा संसार घोड्यांच्या पाठीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:24 PM2019-05-05T23:24:33+5:302019-05-05T23:24:39+5:30

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दुष्काळ म्हणजे काय आणि त्यानं काय होतं हे पाहायचे असेल तर ...

The backbone of the family of Banarwadi families | बनगरवाडी कुटुंबांचा संसार घोड्यांच्या पाठीवर

बनगरवाडी कुटुंबांचा संसार घोड्यांच्या पाठीवर

Next

नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दुष्काळ म्हणजे काय आणि त्यानं काय होतं हे पाहायचे असेल तर माणदेशात गेलंच पाहिजे. कारण, माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत. बनगरवाडीतील मेंढपाळांची तर आठ कुटुंबे दिवाळीपासून घोड्यावर संसार बांधून मराठवाड्यात आहेत. मेंढ्या जगविण्यासाठी रोज त्यांना नवे गाव शोधावे लागत आहे.
माण तालुक्यात बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेती. त्याचबरोबर या शेतीवर अवलंबून असणारा दुग्ध, शेळी-मेंढीपालन व्यवसाय. या तालुक्यातील आजही अनेक गावांत मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. या व्यवसायावरच त्यांचा वर्षानुवर्षे उदरनिर्वाह चालतो. दरवर्षी जून महिन्यानंतर पाऊस झाला की सगळीकडे आबादी आबाद असते; पण एखाद्या वर्षी पावसाने डोळे वटारले की जनावरे जगविण्यासाठी गावच काय घरदार सोडायची वेळ येते. अशाचप्रकारे आताच्या दुष्काळात माण तालुक्यातील अनेक शेतकरी, मेंढपाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या जगविण्यासाठी तालुकाच नव्हे तर जिल्हा सोडून गेले आहेत.
माणमधील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) हे गाव. जेमतेम दोन हजार लोकसंख्या गावाची. या गावातील तरुणवर्ग पुण्या-मुंबईला नोकरीला. तर अनेकांचा मेंढीपालनाचा व्यवसाय. याच गावातील आठ कुटुंबे दुष्काळ पडल्याने गेल्यावर्षी दिवाळी झाल्यानंतर मेंढ्या जगविण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडली आहेत. पंढरपूर, बार्शी अशी गावे करत आज ही कुटुंबे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहेत. या बनगरवाडीतील अशोक बनगर, किसन बनगर, सदाशिव वाघमोडे, चंद्रकांत ढेरे, धर्मा दोलताडे, नेताजी बनगर, गणेश शिंगाडे आणि दत्तू काळे हे मेंढ्या जगविण्यासाठी बाहेर पडलेत. तसेच यांच्या घरातील माणसे मिळून १५ जण ५०० मेंढ्यासाठी झटत आहेत. कोणी मेंढ्यामागे जाते तर कोणी थांबलेल्या ठिकाणी स्वयंपाक करते. कोणी विहिरीतून पाणी काढून मेंढ्यांची तहान भागवते. तर कोणी चारा कोठे मिळतोय का ? याचा शोध घेतो. त्यामुळे सर्वांनाच दररोज नव्या गावात मुक्काम करावा लागतो. मग, तो जागा घाणीचा असो किंवा काट्याकुट्याचा; पण जगायचं आणि जगवायचं हेच ठरवून घरातून बाहेर पडलेल्या या कुटुंबांना आता पाऊस पडेपर्यंत मराठवाड्यातच राहावं लागणार आहे.


मोबाईल चार्जिंग करायला एकजण...
मेंढपाळ कुटुंबीय मराठवाड्यात असलीतरी गावी मुलं, आई-वडील, नातेवाईक आहेत. त्यांच्याशी दरररोज नसलातरी दोन-चार दिवसांतून संपर्क करावा लागतो. त्यासाठी काहीजणांकडे मोबाईल आहे. हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी शेजारील गावात जावे लागते. सर्वांचेच मोबाईल एकाने न्यायचे व ते चार्ज करून आणायचे. तोपर्यंत इतरांना मेंढ्यांना पाणी पाजणे, वाघर लावणे, दळण, जळण गोळा मरणे अशी कामे करावी लागतात. तर या कुटुंबाबरोबर ५०० मेंढ्या, ८ घोडी आणि ६ कुत्री आहेत. घोड्यावर कुटुंबाचा सारा संसार असतो.

Web Title: The backbone of the family of Banarwadi families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.