ग्रामपंचायतींतील मागासवर्गीय निधीचा वापर कोरोनासाठी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:39 AM2021-05-09T04:39:54+5:302021-05-09T04:39:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाई : ग्रामपंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला १५ टक्के निधीचा वापर कोरोना महामारीच्या उपाययोजनांसाठी खर्च करावा. त्यातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : ग्रामपंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला १५ टक्के निधीचा वापर कोरोना महामारीच्या उपाययोजनांसाठी खर्च करावा. त्यातून प्रत्येक तालुक्यात २५ व्हेंटिलेटर बेड्स निर्माण करावेत, अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सातारा जिल्हाधिकरी यांना निवेदन दिले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या देशात व राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. या लाटेने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. यामध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध न झाल्याने मागासवर्गीय, दलित, कष्टकरी जनतेचे बळी जाऊ लागले आहेत. कुठल्याही तालुक्यामध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेबरोबर दलित जनता ही कोरोनाची शिकार होत आहे. या लोकांना जगण्यासाठी एकवेळचे जेवण मिळत नाही. तर ते उपचारासाठी पैसे कोठून आणणार आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे तर शासनाने एका दिवसासाठी ९ हजार रुपये दर काढला आहे. एवढे पैसे सामान्य जनतेच्या जवळ नसल्याने ते उपचार घेऊ शकत नाही. त्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील १५ टक्के राखीव असलेला मागासवर्गीय निधी एकत्रित करावा व त्यामधून गोरगरिबांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान २५ व्हेंटिलेटर बेड्सचे हॉस्पिटल उभे करावे. आणि सामान्य माणसाला कोरोनापासून वाचण्यासाठीचा मार्ग खुला करावा. असे केल्याने सामान्य व गरीब माणसाचा जीव वाचेल. गावाचा विकास हा आज नाहीतर उद्या होणारच आहे. माणूस जिवंत राहिला तरच या विकासकामांचा उपयोग आहे. म्हणून सर्व दलित चळवळीतील संघटना एकत्र येऊन मागासवर्गीय १५ टक्के तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर कोरोनाच्या उपाययोजनांसाठी करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.