तामजाईनगर येथे रस्त्याची बिकट अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:18+5:302021-04-10T04:38:18+5:30
करंजे : करंजेतर्फे तामजाईनगर येथील रस्त्याची अवस्था बिकट असून, दुरुस्तीसाठी नागरिकांमधून मागणी होत आहे. करंजेतर्फे तामजाईनगर येथील रस्त्यावर खड्डे ...
करंजे : करंजेतर्फे तामजाईनगर येथील रस्त्याची अवस्था बिकट असून, दुरुस्तीसाठी नागरिकांमधून मागणी होत आहे. करंजेतर्फे तामजाईनगर येथील रस्त्यावर खड्डे पडले असूनही या रस्त्याकडे बरेच दिवस झाले दुर्लक्ष झाले आहे.
या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण बऱ्याच दिवसांपूर्वी केले आहे. जे रस्ते डांबरीकरण केले आहे, त्यांची रुंदी अतिशय कमी आहे. खड्डे पडल्यामुळे रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरले आहे. वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा या रस्त्यावर मातीवरून वाहन घसरून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वाऱ्यामुळे बऱ्याच वेळा रस्त्यावरील माती ही घरात येत असल्याने नागरिक या धुळीला वैतागले आहेत. सातारा शहरालगत असल्याने या भागाचा विस्तार झालेला आहे, पण या विस्तारित भागात नागरिकांना शासकीय सोयी मिळत नाहीत, असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
या भागातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था फार बिकट झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी रस्त्याकडेला मातीचे मोठे ढिगारे पसरले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याकडेला बांधकामाचे साहित्य पडलेले दिसून येत आहे. शासकीय कारणासाठी येथील रस्त्याची खुदाई करण्यात आलेली असून, काम झाल्यानंतर या ठिकाणी डांबरीकरण झाल्याचे पाहावयास मिळत नाही. आधीच अरुंद रस्ते व खुदाई केलेला भाग यामुळे वाहन चालवताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
चौकट..
डांबरीकरण करा अन्यथा...आंदोलन करू
या भागातील शासकीय अधिकारी वर्गाने वेळीच लक्ष देऊन तामजाईनगर येथील मुख्य रस्ता व अंतर्गत जाणारे रस्ते यांची दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, अन्यथा येथील नागरिक रस्त्यासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे येथील राजकीय नेते व शासकीय यंत्रणांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागणार, हे मात्र निश्चित.
०९करंजे
करंजेतर्फे तामजाईनगर येथील रस्त्याची अवस्था बिकट असून, दुरुस्तीसाठी नागरिकांमधून मागणी होत आहे.