‘लक्ष्मी’च्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा!
By admin | Published: March 11, 2015 10:50 PM2015-03-11T22:50:44+5:302015-03-12T00:08:13+5:30
सक्तीची वसुली : ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी सहकार विभाग सज्ज
सागर गुजर - सातारा अनेक वर्षांपासून अवसायनात असलेल्या लक्ष्मी सहकारी बँकेच्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. येत्या एप्रिलनंतर संबंधितांकडून सक्तीची वसुली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी निबंधक आनंद कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. लक्ष्मी बँकेच्या ४९६ थकबाकीदारांकडे एकूण दहा कोटी ८४ लाखांची थकबाकी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून आहे. ही बँक अवसायनात आल्यानंतर या कर्जदारांनी बँकेचे कर्ज भरले नव्हते. या बँकेकडे ९६३ ठेवीदारांची एकूण १५ कोटी ७९ रुपयांच्या ठेवी होत्या. त्यापैकी एक लाखाच्या खाली असणाऱ्या ८३१ ठेवीदारांच्या तीन कोटी २४ लाखांच्या ठेवी जिल्हा उपनिबंधक विभागाने बँकेवर ताबा मिळविल्यानंतर परत केल्या आहे. उर्वरित १३२ ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हे ठेवीदार ठेवी परत मिळण्याच्या आशेवर आहेत. ही बँक बुडल्यानंतर ठेवीदारांनी ठेवी मिळण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला होता. बँकेवर शासनाच्या सहकार विभागाचा ताबा आल्यानंतर ठेवी आज ना उद्या मिळतील, या खात्रीने ठेवीदारांचा संघर्ष कमी झाला. अनेक वर्षांपासून ठेवींचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. ही बँक अवसायानात आल्यानंतर सहकार खात्यातर्फे बँकेची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली होती. बँकेवर अवसायक म्हणून खंडाळ्याचे सहायक निबंधक संदीपकुमार सुद्रिक यांची नियुक्ती करण्यात आली. कर्जदारांच्या मालमत्तेवर सहकार विभागाने बोजा चढविला असल्याने वसुली करणे सोपे झाले आहे. कर्जदारांनी थकित कर्ज न भरल्यास त्यांची मालमत्ता जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत ताब्यात घेतली जाऊ शकते. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. निवडणुकांनंतर वसुलीची कारवाई सुरू होणार आहे.
एक रकमीचा प्रस्ताव शासनाकडून मान्य
लक्ष्मी ही सातारा जिल्ह्यातील एकमेव अवसायनात आलेली बँक आहे. बँकेच्या कर्जदारांकडे करोडो रुपयांची येणी बाकी असल्याने ती वसूल होत नव्हती. दरम्यान, कर्जदारांवर व्याजाचा बोजाही वाढला होता. ‘एनपीए’त गेलेल्या प्रकरणांवर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारण्यात येते. त्यामुळे कर्जाची रक्कमही वाढली होती. जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत कर्जदारांकडून एकरकमी कर्ज वसुलीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार सरळव्याज पद्धतीने कर्जाची वसुली करण्याचे निर्देश नुकतेच शासनाच्या सहकार विभागामार्फत झाले आहेत.
बँकेची मालमत्ता सहकार विभागाने ताब्यात घेतली आहे. सद्य:स्थितीत संगमनगर येथील बँकेच्या इमारतीची देखभाल आमच्या विभागामार्फत घेतली जात आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका संपताच थकबाकी ठेवणाऱ्या कर्जदारांकडून सक्तीने वसुली करण्यात येणार आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी आमच्या विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
- आनंद कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा