वाघांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा ‘बहेली’ सापळा कऱ्हाडच्या शिवारात!, परप्रांतीय शिकारी टोळ्या करतात वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 04:45 PM2023-08-02T16:45:05+5:302023-08-02T16:45:27+5:30
कसा असतो ‘बहेली’ सापळा?..जाणून घ्या
संजय पाटील
कऱ्हाड (सातारा) : खोडशी आणि त्यानंतर शहापूरच्या शिवारात परप्रांतीय शिकारी टोळ्या वापरत असलेला ‘बहेली’ प्रकारचा सापळा आढळला. बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. ‘बहेलिया’ आणि ‘बावरिया’ शिकारी टोळ्या प्रामुख्याने वाघांच्या शिकारीसाठी ‘बहेली’ सापळा वापरतात; पण कऱ्हाडात हे सापळे आलेच कसे आणि कोणत्या उद्देशाने ते शिवारात लावले गेले, हा खरा प्रश्न आहे.
खोडशीच्या शिवारात ७ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘बहेली’ प्रकारचा सापळा आढळला होता. त्यावेळी या सापळ्यात एक बिबट्या अडकला होता. संबंधित बिबट्याची सुखरूप सुटका झाली खरी; पण त्या गुन्ह्याच्या तपासात वन विभागाच्या हाती जास्त काही लागले नाही. संबंधित गुन्ह्यात एका स्थानिकाला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याने तो सापळा ज्याच्याकडून घेतला ती व्यक्ती त्यावेळी हयात नव्हती. त्यामुळे वन विभागाच्या तपासाची कडी त्याच ठिकाणी खंडित झाली.
त्यानंतर पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी २८ जुलै रोजी तसाच सापळा शहापूरच्या शिवारात आढळला. यावेळी सापळ्यात चुकून एक श्वान अडकला होता. त्या श्वानाचीही सुखरूप सुटका झाली. मात्र, परप्रांतीय शिकारी टोळ्या वापरत असलेले हे ‘बहेली’ सापळे कऱ्हाडच्या शिवारात येतात कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कसा आहे हा ‘बहेली’ सापळा?
- ‘बहेली’ सापळा हा साखळी व पूर्णपणे लोखंडापासून बनवलेला असतो.
- दीड ते दोन फूट साखळीला पुढे चिमटा तयार करण्यात आलेला असतो.
- वन्यप्राण्याचा पाय पडला की चिमटा सुटून त्यामध्ये प्राण्याचा पाय अडकतो.
- पाय सोडविण्यासाठी प्राणी जेवढी धडपड करेल तेवढा तो चिमटा पायात रुतून घट्ट होत जातो.
बहेलिया, बावरिया शिकारी टोळ्या
मध्य प्रदेशातील ‘कटनी गँग’ म्हणून ‘बहेलिया’ या शिकारी टोळीला ओळखले जाते. तसेच पंजाब, हरयाणा, राजस्थानमध्ये ‘बावरिया’ ही शिकारी टोळी कार्यरत आहे. या दोन्ही टोळ्या ‘बहेली’ सापळा वापरतात. प्रामुख्याने वाघांची शिकार या दोन्ही टोळ्यांकडून केली जाते. सध्या या दोन्ही टोळ्या क्रियाशील आहेत.