जळीतग्रस्तांना मदतीच्या नावाखाली आश्वासनांची खैरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:26+5:302021-04-26T04:35:26+5:30
सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या ...
सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या खैरातीच मिळाल्या आहेत. मदतीच्या आशेने येथील कुटुंबीय ऊन, वारा, पाऊस आदी नैसर्गिक संकटांना सामोरे जात आपले हलाखीचे आयुष्य जगत आहेत.
वरचे घोटील येथील पवार कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत असताना घराला अचानक आग लागली. आग निदर्शनास येताच कुटुंबातील लहान - मोठी माणसे घराबाहेर पडली. मात्र, घराशेजारी असलेल्या गोठ्यातील चार ते पाच जनावरे या आगीत होरपळून मृत्यूमुखी पावली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या आगीच्या दुर्घटनेत धान्य, कपडे, शेतीची अवजारे, दागिने, पैसे असे एकूण २२ लाखांचे नुकसान झाले. पवार कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ हळहळले. संबंधित कुटुंबियांना विभागातील ग्रामस्थांनी धान्य, कपडे तसेच इतर साहित्याची मदत केली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याला आता चार वर्षे झाली. तरीही या कुटुंबीयांना एक रुपयाचीही शासकीय मदत मिळाली नाही. शिवाय तातडीने सर्वेक्षण करून घरे बांधून देऊ, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी पुन्हा त्याठिकाणी फिरकलेही नाहीत.
प्रधानमंत्री आवास योजनेतून विशेष बाब म्हणून घरकुल मिळावे, यासाठी पवार कुटुंबियांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यालाही यश मिळत नाही. जळीतग्रस्त सहा कुटुंबे चार वर्षांपासून निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयाचे दरवाजेही त्यांनी ठोठावले. मात्र, पदरी निराशाच आली.
- चौकट
वरचे घोटील हे गाव वाल्मिक पठारावरील डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे. हे गाव अनेक नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेले आहे. पावसाळ्यात डोंगर पठारावरील दरड कोसळणे, रस्ता खचणे, अतिवृष्टीमुळे जमीन वाहून जाणे, पिकांचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होणे अशा अनेक समस्यांना येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.
- चौकट
वरचे घोटील येथील जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळणार असल्याने सुरूवातीला त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, शासन दरबारी आपली फरपट होईल, हे त्यांना माहीत नव्हते. तब्बल वर्षभर शासनाच्या तालुका, जिल्हा कार्यालयात त्यांनी हेलपाटे मारले. मात्र, शासनाकडून एक छदामही मदत मिळालेली नाही. अजूनही हे कुटुंब शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
- कोट
गत चार वर्षांपासून आम्ही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहोत. आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. आम्हाला तातडीने मदत देतो, असे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आमचे २२ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, एक रुपयाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.
- मारूती पवार, जळीतग्रस्त