पाऊस पडण्याआधीच जामानिमा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:14+5:302021-07-25T04:32:14+5:30

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा ...

Bail ready before it rains | पाऊस पडण्याआधीच जामानिमा सज्ज

पाऊस पडण्याआधीच जामानिमा सज्ज

Next

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा परिसर, कास, बामणोली, तापोळा, पांगारे खोरे, पाटण, कोयना त्याला लागून असलेला वारणा धरणापर्यंतच्या या सातारा जिल्ह्याच्या परिसरात पावसाळ्यापूर्वी स्थानिक नागरिकांची एकच भिरकिट सुरु असते. पावसाळ्यापूर्वीच चार महिन्यांचा जामानिमा गोळा करण्याची...!

हा सर्वच परिसर अत्यंत दुर्गम आहे. पावसाळ्याचे चार महिने या परिसरातील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. रस्ते खचतात, नद्या, ओढ्यांना पूर येतो, शेतात चिखलराड साठते, मी म्हणणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी घरे सज्ज करण्याच्या कामात स्थानिक जनता गुंतलेली असते. उन्हाळा असतो तेव्हाच काही तयारी केली नाही तर मग उपासमार अन् अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.

कोकणाला लागून असलेल्या या परिसरातील नागरिकांचे राहणीमान हे कोकणी पध्दतीचेच आहे. तुकड्या तुकड्यांची शेती, गुरे -ढोरे, मासेमारी हीच या लोकांची संपत्ती आहे. या परिसरात पावसाचा जोर इतका असतो की, घरातून बाहेर पडणेदेखील कठीण होऊन जाते. स्वयंपाक हा मुख्यत्वे चुलीवरच होत असल्याने उन्हाळ्यातच वाळलेली लाकडे गोळा करण्याचे काम चालते. वाळलेली झाडे अथवा झाडांचा फांद्या तोडून त्या उन्हात वाळवल्या जातात. त्या चांगल्या वाळल्या की मग घरातील सर्वजण मिळून हे पूर्ण सुकलेले जळण माळ्यावर रचतात. पाऊस जरी सप्टेंबरनंतरही लांबला तरी या जळणाचा आधार त्यांना असतो.

पावसाळ्यात घरांना झडपा घातल्या जातात. यामुळे भिंती भिजत नाहीत. घरांवरील कौलांची शेकरण केली जाते. घरामध्ये पाऊस येऊ नये, यासाठी ही उपाययोजना असते. यासोबतच पोटासाठी लागणारा पैसाही सुरक्षितपणे साठवून ठेवला जातो. चटणी, तेल, मीठ, तांदूळ, ज्वारी एवढं जरी जवळ असलं तरी मग रानभाज्या, मासे खाऊनच हे लोक दिवस काढतात. जनावरांचीदेखील व्यवस्थित सोय केली जाते. गोठ्यांची दुरुस्ती करुन घेतली जाते. घरात पाणी घुसू नये, यासाठी ताली बांधल्या जातात. हा सर्व जामानिमा गोळा करुन ठेवण्याची परंपरागत पद्धत या भागात आहे.

पश्चिम भागात ही चालतात कामे...

तरव्याच्या भाजण्या, नांगरणीची कामे, भातखाचरांची डागडुजी, नाचणी शेतीची मशागत, ताली धरणे, पाण्यासाठी पाट तयार करणे, नवीन वावरं तयार करणे. काट्याकुट्यांची अडगळ बाजूला करणे, पडक्या नादुरूस्त भिंती दुरूस्त करणे, घरांची झाडलोट, ढापावरील कचरा काढून कपड्यावरून बांधणी, झडपी बांधणे, घर शाकारणे, लाकडं, शेणकुट, गवत भरणे, गवताच्या राख्या राखून कुंपण करणे, ताली बांधणे, नवीन गोठा तयार करणे, झरा सुरक्षित ठेवणे, चारा गंजी रचणे, शेणारा रचणे, अन्नधान्य साठवणूक करणे ही कामे उन्हाळ्यातच केली जातात.

(सागर गुजर)

फोटो नेम : २४ सागर ०१,०२,०३

Web Title: Bail ready before it rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.