बाजीरावांची ‘रणनीती’ साताऱ्यातूनच!

By admin | Published: December 29, 2015 11:21 PM2015-12-29T23:21:32+5:302015-12-30T00:34:22+5:30

साताऱ्याच्या गादीवर पूर्ण निष्ठा : २१ पैकी तब्बल १५ मोहिमांचे नियोजन शाहू महाराजांच्या सल्लामसलतीतूनच..

Bajirao's 'strategy' from Satara! | बाजीरावांची ‘रणनीती’ साताऱ्यातूनच!

बाजीरावांची ‘रणनीती’ साताऱ्यातूनच!

Next

प्रदीप यादव -- सातारा -कधीही हार न मानता जे अजिंक्य राहिले असे ‘साहबे फुतुहाते उज्जाम’ अन् शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारे ‘शहामतपनाह’ या बिरुदावलीने अखंड हिंदुस्थान ज्यांना ओळखत, असे पराक्रमी बाजीराव पेशवे यांचं बरंचसं आयुष्य साताऱ्यात गेलं. त्यांच्या २१ मोहिमांपैकी तब्बल १५ मोहिमांचे नियोजन त्यांनी साताऱ्यातूनच केले होते.
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटामुळे पेशव्यांचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे प्रसिद्ध चित्रपट कथा-पटकथा-संवाद लेखक प्रताप गंगावणे यांनी इतिहासाच्या सखोल अभ्यासातून बाजीराव पेशवे आणि सातारा यांचं नातं ‘लोकमत’जवळ उलगडलं आहे. आपल्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यातील २४ वर्षे बाजीरावांनी रणांगणावर घालवली. २१ मोहिमा आखल्या आणि ३५० लढाया केल्या. घोड्याची पाठ हेच त्यांचे वस्तीस्थान होते. त्यांच्या हृदयात छत्रपती शाहू महाराजांचा आदेश होता आणि नजरेत स्वराज्याचे साम्राज्य बनविण्याची आस होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. अशा या पराक्रमी योद्ध्याचं साताऱ्याच्या मातीशी अतुट नातं आहे.
संभाजीराजांचे चिरंजीव शाहूमहाराज (थोरले) यांची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर ते साताऱ्यात आले. तेव्हा बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथांनी आपली निष्ठा शाहूमहाराजांच्या चरणी वाहिली. बाजीरावांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना साताऱ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. बाजीराव शाहूमहाराजांचा शब्द प्रमाण मानून काम करीत. मोहिमांची आखणी, महत्त्वाच्या चर्चा साताऱ्यात शाहूमहारांच्या सल्ल्यानेच होत. शाहू महाराजांप्रती असलेल्या निष्ठेचे इतिहासातील दाखले देताना गंगावणे यांनी सांगितलं की, एकदा मुघलांनी शाहू महाराजांकडे सैन्याची कुमक देण्यासाठी मदत मागितली. त्यावेळी शाहू महाराजांनी बाजीरावांना विचारले ‘तुम्ही मुघलांची कुमक म्हणून जाल का?’ त्यावर बाजीरावांनी उत्तर दिले, ‘मुघल म्हणजे कोण? आज्ञा झाल्यास काळाच्या तोंडातदेखील जाऊन सरकारच्या पुण्यप्रतापे त्यांचा बंदोबस्त करून येऊ.’ एवढी निष्ठा होती.
दिल्ली जिंकण्याचे बाजीरावांचे स्वप्न होते. साताऱ्यातून ते दिल्लीला गेले. दिल्लीवर स्वारी केली. त्यावेळी दिल्लीचा बादशहा लपून बसला. परंतु ‘दिल्ली महास्थळ पातशहा बरबाद जालियात फायदा नाही’ या शाहू महाराजांच्या पत्रामुळे ते माघारी फिरले. बाजीरावांनी दिल्ली हातात आली असताना सोडून दिली. बाजीराव पुरंदरमध्ये रहात असले तरी त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ साताऱ्यात गेला आहे, याबाबत इतिहासातील विविध दाखले गंगावणे यांनी दिले.


मसूरमध्ये पेशव्यांची वस्त्रे प्रदान
बाळाजी विश्वनाथ हे छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशवे होते. बाजीराव आपल्या वडिलांबरोबर नेहमी साताऱ्यात येत. सध्याच्या अदालत वाड्यासमोर असलेल्या बोळातील एका वाड्यात ते राहात. बाळाजी विश्वनाथांच्या निधनानंतर दुसरा पेशवा कोण होणार, याबाबत साताऱ्यात चर्चा झाल्या. त्यावेळी बाजीराव २० वर्षांचे होते. पेशवा होण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र, शाहूमहाराजांनी बाजीरावांची पेशवेपदी निवड केली. १७२० मध्ये त्यांना पेशव्यांची वस्त्रे प्रदान केली. तो ऐतिहासिक सोहळा त्यावेळच्या सातारा मुलुखातील मसूर येथे झाला.


वडूथच्या महादेव मंदिरात ‘शकुन’
बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर पेशवेपदी कोणाची निवड करायची, याबाबत साताऱ्यात शाहूमहाराजांनी चर्चा केली. अनेकजण इच्छुक होते. या चर्चेस प्रतिनिधी, सुमंत, सरदार असे अनेकजण उपस्थित होते. सासवडवरून साताऱ्याकडे येताना वडूथ येथील महादेवाच्या मंदिरात नेहमीप्रमाणे बाजीराव दर्शनासाठी थांबले तेव्हा त्याठिकाणी पेशवेपदी आपली निवड झाल्याचे समजले. तेव्हापासून या महादेवाला ‘शकुनी महादेव’ म्हणून ओळखले जाऊ लागले.


बाजीराव रेठरेकरांना मानले होते भाऊ
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुकचे सरदार बाजीराव रेठरेकर यांना बाजीराव पेशवे भाऊ मानत. तारापूरच्या लढाईत बाजीराव रेठरेकर मरण पावला. त्यावेळी त्यांच्या आईस बाजीरावांनी पत्र लिहिले... ‘तुम्हास मोठा शोक प्राप्त झाला. बाजी भीवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी झाले. इश्वरे मोठे अनुचित केले. आमचा तर भाऊ गेला. मीच तुमचा बाजीराव, असा विवेक करून धीर करावा.’ बाजीराव पेशव्यांनी माणसं कशी जपली होती, याचं हे उदाहरण अनेकांना माहीतही नसेल.

बाजीराव पेशव्यांनी ३५० लढाया लढल्या. हा इतिहास असतानाही एक पराक्रमी योद्धा म्हणून ते फार कमी लोकांपर्यंत पोहोचले. ‘बाजीराव-मस्तानी’ एवढाच काय तो इतिहास लोकांना माहीत आहे. पण थोरले बाजीराव हे सर्वार्थाने थोरलेच होते. त्याचा खरा इतिहास पुढे यावा, यासाठी मी लिहित असलेल्या पुस्तकातून बाजीरावांचे कार्यकर्तृत्व मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
- प्रताप गंगावणे,
कथा, पटकथा, संवाद लेखक, सातारा.


आईसाठी शनिवारवाड्याची उभारणी
बाजीराव पेशवे महालात कमी अन् रणांगणावर जास्त राहिले. ते पुरंदरला रहात असले तरी जास्त काळ बाहेरच जायचा. अशावेळी आईसाठी सुरक्षित ठिकाण असावे म्हणून त्यांनी शाहू महाराजांकडून पुण्यात जागा घेतली आणि शनिवारवाडा बांधला. शाहू महाराजांचा बाजीरावांवर प्रचंड विश्वास होता तर बाजीरावही शाहू महाराजाचे निष्ठावंत पेशवे होते.


माहुलीचा कृष्णाकाठ
विशेष प्रिय
बाजीराव आपल्या वडिलांबरोबर साताऱ्यात येत. येथे वास्तव्य करीत. पुढे पेशवेपदी निवड झाल्यानंतरही ते साताऱ्यात वास्तव्य करीत. या काळात ते माहुली येथे कृष्णा नदीच्या डोहात पोहायला जात. घाटावर व्यायाम करत. कृष्णाकाठ त्यांना विशेष प्रिय होता.


ब्रम्हेंद्रस्वामींबाबत आदर अन् नाराजीही

धावडशीचे ब्रम्हेंद्रस्वामी हे त्यावेळी कर्ज देत. बाजीराव आपल्या सैन्यासाठी त्यांच्याकडून कर्ज घेत. पण स्वराज्यासाठी लढणाऱ्या सैन्यासाठी दिलेल्या कर्जावर ते व्याज घेत असल्यामुळे बाजीराव पेशवे नाराज होते. ती नाराजी त्यांनी स्वामींजवळ बोलूनही दाखविली होती.

Web Title: Bajirao's 'strategy' from Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.