‘बक्कळ नगं’.. सरासरीएवढा पडला तरी पुरे!
By admin | Published: June 27, 2016 11:13 PM2016-06-27T23:13:25+5:302016-06-28T00:33:33+5:30
शेतकऱ्यांपुढे चिंता : महिन्यात केवळ एकूण १२३६ मिलीमीटर पावसाची नोंद; प्रतीक्षा दमदार पावसाची
सचिन काकडे --सातारा जिल्ह्यात मान्सून उशिरा का होईना सक्रिय झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, एक जूनपासूून आजअखेर जिल्ह्यात केवळ १२३६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मान्सूनचे उशिरा आगमन आणि कमी पर्जन्यमान पाहता यंदा तरी पाऊस सरासरी गाठणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
सातारा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सुमारे ८ ते ९ हजार मिलीमीटर इतके आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला तरच पाऊस सरासरी गाठतो. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे वेगळेच चित्र निर्माण झाले. मान्सून वेळेवर म्हणजे २ ते ५ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता; परंतु प्रत्यक्षात मान्सून २० जूननंतर सक्रिय झाला. एक जूननंतर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. तर दुष्काळी माण-खटाव तालुक्यांवर पावसाने कृपादृष्टी दाखविली आहे.
याठिकाणी झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला. तसेच शेतकऱ्यांची पेरण्यांची कामेही सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात इतर ठिकाणी पावसाने पाठ फिरवली. २० जूननंतर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी अजून कुठेही दमदार पाऊस झाला नाही. एक जूनपासून आजअखेर सर्वात कमी ६६.८ मिलीमीटर पाऊस वाई तालुक्यात झाला असून, यानंतर सातारा तालुक्यात ६७.९ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आजअखेर १२३६ मिलीमीटर पाऊस झाला असून, पावसाची सरासरी ११२.४ इतकी आहे.
सातारा परिसरात अजून पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यातच परिसरात अजूनही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कास धरणाची पाणी पातळी खालावल्याने शहरात एक दिवस पाणी कपात सुरू आहे.
महाबळेश्वरला सर्वाधिक
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात एक जूनपासून आजअखेर सर्वाधिक २४९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झाला नव्हता. जून महिना कोरडा गेल्याने पाऊस गेल्या वर्षाची पुनरावृत्ती करणार की सरासरी गाठणार, याचे उत्तर पावसावरच अवलंबून आहे.
माण-खटाववर कृपादृष्टी
पावसाचे आगमन पश्चिमेकडून होते हा इतिहास असला तरी यंदा मान्सूनने प्रथमच पूर्वेकडून हजेरी लावली. पूर्वेकडील माण-खटाव हे तालुके दुष्काळी म्हणून संबोधले जातात. पावसाने या ठिकाणी दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. खटाव तालुक्यात आजअखेर १३९.३ मिमी तर माण तालुक्यात १४५.५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
कोयनेत ७.०७ टीएमसी
जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहे. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस केवळ ७.०७ टीमएसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. आता धरण भरण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.