घडतंय- बिघडतंय: 'बाळासाहेब'च विखुरलेल्या विरोधकांच्या एकीकरणाचे 'शिल्पकार'!
By प्रमोद सुकरे | Published: May 5, 2023 10:07 PM2023-05-05T22:07:38+5:302023-05-05T22:08:11+5:30
कराड उत्तरमध्ये बाजार समितीला 'एकीच्या बळाचे मिळाले फळ'
कराड : कराड तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. येथे कराड दक्षिण व कराड उत्तर असे विधानसभेचे दोन मतदार संघ आहेत. पैकी उत्तर मतदार संघात कराड तालुक्यासह सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यातील काही भाग समाविष्ट आहे. त्यामुळे येथील विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सक्षम उमेदवार आणि विरोधकांचा मेळ आज पर्यंत बसला नाही. पण तोच विरोधकांचा मेळ बाजार समितीच्या निवडणुकीत बसलेला दिसतोय. त्याचे शिल्पकार बाळासाहेब पाटीलच ठरले आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक नुकतीच पार पडली. यात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व कराड दक्षिण भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी शेतकरी विकास पॅनेल रिंगणात उतरवले. मग सत्ताधारी काँग्रेसचे नेते अँड. उदयसिंह पाटील यांनीही दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी ठेवली. काँग्रेस मधील दोन गटांचा पहिल्यांदा मेळ घातला. अन उत्तरेतील भाजप नेत्यांनाही व्यवस्थित हाताळले. 'शत्रूचा शत्रुत्व तो आपला मित्र' याप्रमाणे साऱ्या विरोधकांना एकत्र येण्याची संधीच आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. त्याचा फायदा त्यांनी करुन घेतला असेच म्हणावे लागेल.
मग उत्तरेतील काँग्रेसचे नेते प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील - चिखलीकर, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे,पंचायत समितीचे माजी सभापती एम.जी. थोरात, निवासराव निकम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवासराव थोरात यांच्यासह सर्वांनी मतभेद विसरून एक दिलाने निवडणुकीत काम केले. तर भाजपचे नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनीही पक्षीय जोडे बाजूला ठेवून रयत पॅनेलला बळ दिले.या साऱ्यांच्या 'एकीचे बळ निकालरुपी फळ' देऊन गेले आहे हे निश्चित.
खरंतर यापूर्वी तालुक्याच्या राजकारणात दिवंगत विलासराव पाटील व पी डी पाटील यांची प्रदीर्घकाळ अलिखित आघाडी राहिली होती. पुढील पिढीतही बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील यांनीही ही आघाडी पुढे चालू ठेवली पण वर्षभरापूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत त्याला छेद गेला. तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या मदतीने जिल्हा बँकेचा गड सर केला. अँड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला. तो पराभव उदयसिंह पाटील समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही तीच आघाडी त्या दोघांनी कायम ठेवली. मात्र प्रत्यक्ष निकालात त्यांना अपेक्षित करिष्मा दाखवता आलेला नाही.रयत पँनेलला मिळवलेले यश, विशेषता ग्रामपंचायत मतदार संघातील त्यांनी जिंकलेल्या सर्व जागा ही बाब बाळासाहेब पाटील यांना निश्चितच विचार करायला लावणारी आहे.
राष्ट्रवादीचे ३ तर विरोधकांचे ४ संचालक
कराड तालुक्यातील पाल, उंब्रज, मसूर ,कोपर्डे हवेली हे ४ जिल्हा परिषद गट व हजारमाची पंचायत समिती गण याचा कराड उत्तर मध्ये समावेश आहे. बाजार समिती निवडणुकीत सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना येथे अपेक्षित मतदान झालेले दिसत नाही. उलट विरोधकांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केलेली दिसते. म्हणून तर येथे बाळासाहेब पाटील यांचे ३ संचालक निवडून आले असले तरी विरोधी रयत पॅनलचे ४ संचालक निवडून आले आहेत. ही बाबही विचार करायला लावणारीच आहे.
सातारला भाजपचीच बाजी!
सातारा तालुक्यातील वर्णे व नागठाणे हे २ जिल्हा परिषद गट कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येतात. सातारच्या बाजार समिती निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व मनोज घोरपडे आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सुमारे ९०० मतांच्या फरकाने त्यांनी सर्व जागा जिंकल्या आहेत. पैकी ३ संचालक हे या २ जिल्हा परिषद मतदार संघातून विजयी झाले आहेत. ही गोष्ट ही महत्त्वाची आहे.
खटावला राष्ट्रवादी चा पराभव
खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गट कराड उत्तर मतदार संघात येतो. येथील बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या पँनेलने १३जागा जिंकत आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख यांच्या राष्ट्रवादीच्या पँनेलचा पराभव केला. येथे प्रभाकर घार्गे यांना भाजपचे नेते मनोज घोरपडे व धैर्यशिल कदम यांची साथ लाभली. तर या गटातून बाजार समितीवर त्यांचे ३ संचालक निवडून गेले आहेत.
कोरेगावात राष्ट्रवादीची बाजी
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गट व अपशिंगे गण याचा समावेश ही कराड उत्तर मतदारसंघात होतो. येथील बाजार समिती निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पँनेलने सेनेचे आमदार महेश शिंदे व भाजपचे नेते मनोज घोरपडे यांच्या पॅनेलचा पराभव केला आहे. पण या गटातील सुमारे २९० मतदानापैकी अंदाजे २० मते राष्ट्रवादीच्या पँनेलला जादा मिळाली आहेत .पण विरोधकांना पडलेली मते दुर्लक्षीत करून चालणार नाहीत.