वसुलीच्या विरोधात बळीराजा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:42+5:302021-07-09T04:24:42+5:30
कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. त्यातच थकीत कर्जासाठी बँका, पतसंस्था व थकीत वीजबिलासाठी महावितरण कंपनी ...
कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. त्यातच थकीत कर्जासाठी बँका, पतसंस्था व थकीत वीजबिलासाठी महावितरण कंपनी ग्राहकांच्या मागे लागली आहे. ही वसुली तत्काळ थांबवावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना या वसुली अधिकाऱ्यांविरोधात हातात दांडके घेऊन आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी दिला आहे.
गत दोन वर्ष कोरोना महामारीविरोधात सर्वजण लढा देत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. जिल्ह्यातील प्रशासनाने वारंवार लॉकडाऊन केले आहे. त्याला जनतेने सहकार्यही केले आहे. आता पुन्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून, अनेक व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत. याचवेळी बँकांचे कर्जावरील व्याज मात्र सुरूच आहे. महावितरणची थकीत बिलापोटी सक्तीची वसुली सुरूच आहे. मायक्रो फायनान्सची वसुलीसाठी दादागिरी सुरू आहे. याबाबत प्रशासनाने सक्तीची व सर्वप्रकारच्या कर वसुलीला स्थगिती द्यावी. प्रशासनाने लॉकडाऊन लावावे, मात्र जनतेच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यावर काहीही बोलायला तयार नाहीत. सर्वसामान्य जनता मात्र मेटाकुटीस आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणसह मायक्रो फायनान्स, बँका, पतसंस्थांना आदेश देऊन वसुलीला स्थगिती द्यावी.
यापुढे वसुली बळजबरीने सुरू राहिल्यास बळीराजा शेतकरी संघटना या वसुलीविरोधात हातामध्ये दांडकी घेईल. या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.